Maval News : जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत जुन्या वृक्षांची कत्तल; नगरपंचायत कोणावर कारवाई करणार? 

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील नगरपंचायत हद्दीतील जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या लगत असलेल्या नगरपंचायतीच्या कार्यालयाजवळील जुन्या वृक्षांची कत्तल केल्याने वृक्ष व निसर्ग प्रेमींमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. आता याबाबत नगरपंचायत कोणावर कारवाई करणार? याविषयी उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

वडगाव नगरपंचायतीचे प्रशासकीय कार्यालय महादजी शिंदे स्मारकासमोरील खाजगी जागेत स्थलांतरीत झाले आहे. त्या नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर असलेली चिंचेची दोन मोठी जुनी झाडे व काही झाडांच्या फांद्या कत्तल केलेल्या आढळून आल्या आहेत. शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत माझी वसुंधरा उपक्रम सुरू आहे.

झाडांची कत्तल झाल्याने परिसर विद्रुप झाला आहे. त्यामुळे कार्यालया समोरचा भाग भकास झाला आहे. हा भाग पुणे मुंबई महामार्गालगत आहे. त्यामुळे इतके वर्षे महामार्गाची साक्ष देणारे वृक्ष त्यांची कत्तल झाल्याने इतिहास जमा झाले आहेत.

नगरपंचायतीच्या कार्यालयासमोरील झाडे तोडलेली आहेत. ती कोणी तोडली? हा चर्चेचा मुद्दा ठरलेला असून त्यासंदर्भात नगरपंचायतीने पोलीस ठाण्यात तक्रार करून संबंधितावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी वृक्ष व निसर्गप्रेमी नागरिकांकडून होत आहे. तसेच नगरपंचायत खरेच संबंधितांवर कारवाई करणार की, कसे? हा औत्सुक्याचा विषय राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.