Maval: जोरदार शक्तीप्रदर्शन करत महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांचा अर्ज दाखल

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं (कवाडे गट, गवई गट, साळवे गट, खोब्रागडे गट) आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी आघाडीच्या वतीने रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

निगडी, येथील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सातव्या मजल्यावरील निवडणूक कार्यालयात पार्थ पवार यांनी अर्ज दाखल केला. पवार यांचा अर्ज दाखल करताना आमदार सुरेश लाड, शेकापचे आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मीनाक्षी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे उपस्थित होते. पार्थ यांच्या आई सुनेत्रा पवार, माजी मंत्री मदन बाफना देखील आले होते.

तत्पूर्वी वाल्हेकरवाडी ते प्राधिकरण कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे, माजी आमदार अण्णा बनसोडे, बापूसाहेब भेगडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी महापौर मंगला कदम, पुणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, नगरसेवक मयूर कलाटे, राजू मिसाळ, जय पवार, निहाल पानसरे, वर्षा जगताप, शहरातील आजी-माजी महापौर आदी उपस्थित राहणार सहभागी झाले होते.

प्राप्त अर्जांची छाननी 10 एप्रिल रोजी होणार आहे. तर, 12 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल आणि प्रचाराला रंगत येईल. मोठ्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरु होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.