Maval: मारहाणीच्या प्रकारांनंतर तालुक्यातील रेशन दुकानदारांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा

पुढारी आणि अधिकाऱ्यांच्या जाचाविरुद्ध रेशन दुकानदार संघटनेची आक्रमक भूमिका

वडगाव मावळ – कोरानाच्या संकटात जीव धोक्यात घालून मावळ तालुक्यातील रेशन दुकानदार धान्य वितरित करत असतानाही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, काही टवाळखोर नाहक त्रास देत असून दुकानदारांना मारहाणीचे प्रकार घडले आहेत. तसेच अधिकारी व लोकप्रतिनिधीही दुकानदारांना धारेवर धरतात. या जाचाला कंटाळून दि 1 मे पासून सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा मावळ तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने दिला आहे. 

याविषयी संघटनेचे अध्यक्ष बाबूलाल नालबंद यांच्यासह सर्व पदाधिकारी व दुकानदारांनी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन दिले असून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासन व राज्य शासनाच्या योजनेप्रमाणे लाभार्थ्यांना धान्य वितरित करण्यात आले असून प्रतिव्यक्ती पाच किलो प्रमाणे मोफत तांदूळ वाटपही पूर्ण होत आले आहे. परंतु राजकीय पक्षांचे काही कार्यकर्ते तर समाजातील काही टवाळखोर सोशल मिडियाच्या माध्यमातून रेशनिंग दुकानदारांची नाहक बदनामी करत आहेत.

वस्तुत: अन्न सुरक्षा कायदा 2013 आमलात आल्यानंतर शिधापत्रिकाधारकांचे आधार कार्ड लिंक करून घेण्यासाठी कधीही आणि काहीही प्रयत्न केले नाही किंवा प्राधान्य लाभार्थ्यांच्या यादीत शहरी भाग 45% आणि ग्रामीण भाग 76% शिधापत्रिका धारकांचा सामावेश करण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले गेले नाहीत.

एका राजकीय पक्षाच्या शहराध्यक्षाने दुकानदारांकडे मागितलेली कागदपत्रे न दिल्याने दुकानदारांस मारहाण केली. नाणोली तर्फे चाकण येथे सरपंच, उपसरपंचांच्या उपस्थितीत धान्य वाटप केले. दिवड येथे मारहाणीचा प्रयत्न तर शिवणे येथे मारहाणीचा प्रकार आणि पाचाणे येथे जबरदस्तीने धान्य नेण्याचा प्रकार घडला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

वास्तविक शासनाने मास्क, सॅनिटायझर सारख्या सुविधा न देताही स्वतःचा जीव धोक्यात घालून रेशन दुकानदार नियमांचे पालन करूनच धान्य वितरित करत आहेत. परंतु काही काही राजकीय कार्यकर्ते, टवाळखोर शासकीय योजनांची माहिती न घेता नाहक त्रास देत असून दुकानदारांची बदनामी करत आहेत. तसेच  अधिकारी व लोकप्रतिनिधीही खरी माहिती जाणून न घेता रेशन दुकानदारांना लक्ष्य करतात. त्यामुळे सतत होणा-या या त्रासाला कंटाळून तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांनी सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

खोटे उत्पन्न दाखवून धान्य लाटणाऱ्यांवरही कारवाई करा – बाबूलाल नालबंद
रेशन दुकानदार नियम डावलून चुकीच्या पद्धतीने धान्य वितरित करत असतील तर त्या दुकानदारांवर खुशाल कारवाई करावी. तसेच रेशनकार्डवर खोटे उत्पन्न दाखवून लाभ घेणारे नागरिक व सोशल मीडियावर पोस्ट टाकून बदनामी करणा-यांवरही कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया मावळ तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष बाबूलाल नालबंद यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.