Maval : सात नागरिकांसह 30 जनावरांची पुरातून सुटका केल्याबद्दल शिवदुर्ग टीमचा 51 हजार रुपये देऊन गौरव

एमपीसी न्यूज – पवना नदीला आलेल्या पुरामुळे मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात सात नागरिक आणि 30 जनावरे पुराच्या पाण्यात अडकली. शिवदुर्ग टीमने शर्थीचे प्रयत्न करून अडकलेल्या नागरिक व जनावरांना सुरक्षित बाहेर काढले. याबद्दल कोथुर्णे गावातील ग्रामस्थ आणि जनावरांचे मालक यांच्याकडून शिवदुर्ग टीमला 51 हजार रुपयांचे बक्षीस देऊन कौतुकाची थाप दिली.

मावळ तालुक्यातील पवना नदीच्या काठावर वसलेल्या कोथुर्णे गावात रविवारी पूर आला. नदीच्या काठावर असलेल्या एका बंगल्यातील सात नागरिक पुराच्या पाण्यात अडकले. त्यांची सुटका शिवदुर्ग टीम आणि एनडीआरएफ कडून करण्यात आली. त्याचबरोबर बचाव पथकाने बंगल्याच्या शेजारी असलेल्या गोठ्यातून 30 जनावरांची देखील सुटका केली.

शनिवारी (दि. 3) आणि रविवारी (दि. 4) पवना धरण साखळीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. धरण पूर्ण भरल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. यामुळे पवना नदीला पूर आला. पवना नदीच्या काठावर वसलेल्या कोथुर्णे गावात पूर आला. गावातील नागरिकांनी वेळीच सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. मात्र, नदीपासून काही अंतरावर असलेल्या एका बंगल्यात सात नागरिक अडकले.

कोथुर्णे गावात आलेल्या पुरात नागरिक अडकल्याची माहिती शिवदुर्ग टीमला मिळाली. लोणावळा शहरात पुराची परिस्थिती असल्याने शिवदुर्ग टीमच्या काही सदस्यांनी लोणावळ्यात तर काही सदस्यांनी कोथुर्णे गावात जाण्याचा निर्णय घेतला. शिवदुर्ग टीम आणि एनडीआरएफचे पथक बोट आणि आवश्यक साहित्य घेऊन कोथुर्णे गावात पोहोचले.

बचाव पथकाने बोटीतून बंगल्यात प्रवेश केला. दोन महिलांसह एकूण सात नागरिकांना पुरातून बाहेर काढण्यात आले. बंगल्याच्या शेजारी असलेल्या एका गोठ्यात 30 गाई आणि म्हशी अडकल्याचे बचाव पथकाला समजले. पाण्यात दोरी टाकून जनावरांना देखील बाहेर काढण्यात आले. हे काम शिवदुर्ग टीमने दोन दिवस अविरतपणे केले.

गोठ्याचे मालक रामचंद्र नढे व ग्रामस्थांनी शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या आनंद गावडे, राजेंद्र कडू, महेश मसने, दिनेश पवार, राहुल देशमुख, प्रणय अंभोरे, केदार देवाळे, विकास मावकर, सागर कुंभार, अनिल आंद्रे, तुषार सातकर, रोहीत वर्तक, रितेश कुडतरकर, सुनिल गायकवाड आदींचे कौतुक केले. टीमला 51 हजार रुपयांचे रोख बक्षीस देखील दिले. ग्रामस्थांनी केलेली आर्थिक मदत शिवदुर्ग टीमला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.