Maval : जिल्हा परिषद अध्यक्षपदी शोभा कदम यांना संधी देण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले असून या प्रवर्गातील मावळातील राष्ट्रवादीच्या कार्यक्षम सदस्या शोभाताई कदम यांच्या रूपाने अध्यक्षपदाची संधी मावळला मिळावी यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार मागणी होत आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत मंगळवार (दि. 19) मुंबई मंत्रालयात काढण्यात आली. त्यात पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. 52 वर्षांच्या इतिहासात मावळ तालुक्याला आजपर्यंत अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही. तालुक्याच्या बदलत्या राजकीय समीकरणामुळे या पदांची संधी मिळण्याची आशा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांना लागून राहिलेली आहे.

आजच्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 42 जिल्हा परिषद सदस्यांपैकी 24 महिला सदस्या आहेत. यापैकी 16 महिला सदस्य खुल्या प्रवर्गातील तर उर्वरित 8 जणी विविध प्रवर्गातून निवडून आलेल्या आहेत. खुल्या गटातून निवडून आलेल्यामध्ये इंदापूर, बारामती, शिरूर, दौंड, हवेली, आंबेगाव आणि मावळ या तालुक्यातील सदस्यांचा समावेश आहे. यापैकी मावळचा अपवाद वगळता इतर सहा तालुक्यातील प्रत्येकी एक जण सध्या जिल्हा परिषदेचा पदाधिकारी आहे.

आतापर्यंत विद्यमान पदाधिकारी असलेल्या तालुक्याला सलग दुस-यांदा संधी न देण्याचा नियम राष्ट्रवादी काँग्रेसने पाळला आहे. या नियमानुसार सध्या मावळ तालुक्याचे पारडे जडच आहे; शिवाय जिल्हा परिषद स्थापनेपासून मावळ तालुका अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोन्ही पदांपासून खूपच दूर राहिला आहे.

त्या अनुषंगाने अध्यक्षपदाची संधी आता मावळलाच असल्याचे दिसते आहे. शोभाताई कदम यांच्या रूपाने ती संधी मिळाली तर मावळला ख-या अर्थाने न्याय मिळाल्याचं सार्थक होईल, असे कदम समर्थकांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शोभा कदम, कुसुम काशीकर व राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष बाबूराव वायकर जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत.

मावळ तालुक्यात गेल्या पंचवीस वर्षापासून आमदारकी भाजपच्या ताब्यात होती, मावळ पंचायत समितीवर भाजपचेच वर्चस्व आहे. मावळ विधानसभेच्या निवडणुकीत 25 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार सुनील शेळके यांच्या रूपाने मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने मावळ तालुक्याला झुकते माफ मिळेल, अशी आशा कार्यकर्ते बाळगून आहेत. मावळ तालुक्यात पुणे जिल्हा परिषदेचे पाच सदस्य असून तीन राष्ट्रवादी काँग्रेसचे तर दोन भारतीय जनता पक्षाचे आहेत.

बाबूराव वायकर यांच्यासाठी मोर्चेबांधणी

विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर जिल्हा परिषद सदस्य बाबूराव वायकर यांना उपाध्यक्ष किंवा सभापतीपदाची संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चाही आहे. त्यामुळे वायकर यांनीही मोर्चेबांधणी केली असून काँग्रेसचे (आय) तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, राष्ट्रवादी ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष सुभाष जाधव, आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते मंगेशकाका ढोरे, माजी सरपंच तुकाराम तथा बुवा ढोरे आदींनी वायकर यांची वर्णी लागण्यासाठी पक्ष श्रेष्ठींकडे जोर लावणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

एकाच तालुक्यातील दोन्ही पदे शक्य नसल्यामुळे महत्त्वाच्या खात्यावर सभापतीपदासाठी वायकर हेही आग्रही आहेत. एकंदरीत विधानसभा निवडणुकीत मिळालेले घवघवीत यश व पंचवीस वर्षानंतर झालेले सत्तांतर याचीच पावती म्हणून मावळ तालुक्याला यावेळी प्रमुख पदांची संधी मिळणार हे जवळपास निश्चित असले तरी अध्यक्ष, उपाध्यक्ष की सभापतीपद मिळणार याची उत्सुकता मावळकरांना लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.