Chinchwad: घरमालकाचा भाडेकरूच्या घरात दरोडा? जबरदस्तीने घरगुती साहित्य नेल्याची तक्रार

एमपीसी न्यूज – घरमालकाने भाडेकरूच्या मुलास मारहाण करून घरातील साहित्य जबरदस्तीने नेले. याप्रकरणी घरमालक आणि त्याच्या साथीदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना विजयनगर, काळेवाडी येथे सोमवारी (दि. 18) सकाळी घडली.

याबाबत संपा पियुष गांगुली (वय 52, रा. काळे बिल्डींग, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार घरमालक शांताराम काळे, त्याची पत्नी, मुलगा व इतर आठ ते दहा जण (पुर्ण नाव पत्ता समजू शकला नाही) यांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपी शांताराम काळे यांच्या खोलीत फिर्यादी संपा गांगुली या भाडेकरू आहेत. गेल्या दहा वर्षांपासून त्यांच्यात खोली खाली करण्यावरून वाद सुरू आहे. सोमवारी सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास आरोपी संपा यांच्या खोलीत आले. त्यांनी फिर्यादी यांच्या मुलास हाताने मारहाण करीत खोलीतील घरसामान जबरदस्तीने घेऊन गेले.

तसेच मुलाच्या कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेतल्या, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पवार तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.