Maval : मावळचा शिलेदार कोण ? मावळमध्ये मतमोजणीची जय्यत तयारी !

एमपीसी न्यूज- मावळ मतदारसंघातील मतमोजणी तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र इंजिनिअरींग काॅलेजमध्ये गुरुवार दि 24 रोजी सकाळी 8 वाजता सुरु होणार असुन दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल जाहीर होईल अशी माहीती निवडणुक निर्णय अधिकारी सुभाष भागडे व सहाय्यक निवडणुक अधिकारी (तहसीलदार) मधुसुदन बर्गे यांनी दिली. त्यामुळे मावळच्या शिलेदार कोण असणार हे उद्या दुपारी जाहीर होणार असल्याने उमेदवारांसहित मतदारांची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

मतमोजणीसाठी काॅलेजच्या आवारात बंदिस्त मंडप, टेबल, खुर्च्या, मॅट, संरक्षक जाळीसह व्यवस्था करण्यात आली आहे. मावळ मतदारसंघात एकूण 2 लाख 47 हजार 961 मतदान झालेले असून प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी प्रत्येक टेबलवर असणार असून असे 14 टेबल आहेत. टपाल मताच्या मोजणीसाठी एक टेबल अशी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी सुद्धा प्रत्येक उमेदवाराचा प्रतिनिधी असणार आहे.

370 मतदान केंद्रामधील मतमोजणीसाठी 14 टेबलांची व्यवस्था असून एकूण 27 फे-या होणार आहेत. प्रत्येक फेरीस सर्व टेबलावर मतमोजणी सुरू राहणार आहे. प्रत्येक टेबलनिहाय एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक सहाय्यक, एक सूक्ष्म निरीक्षक व एक शिपाई असे कर्मचारी असणार आहेत.

सकाळी 8 वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल. दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व फे-यांची मतमोजणी पूर्ण होऊन अधिकृत निकाल घोषित होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मतमोजणी दरम्यानच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. याकरिता कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मावळ विधानसभेसाठी 71.16 टक्के मतदान झाले आहे. मावळमध्ये एकुण ३ लाख 48 हजार 462 मतदार असुन त्या पैकी 1 लाख 31 हजार 406 पुरुष मतदार तर 1 लाख 16 हजार 554 महिला असे एकूण 2 लाख 47 हजार 961 मतदारांनी मतदान केले आहे. शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री बाळा भेगडे व राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्यांत अत्यंत चुरशीची लढत झाल्याने मावळच्या निकालाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.