Mishan Akshay : ॲनिमियामुक्त शहरासाठी ‘मिशन अक्षय’ मोहिमेमध्ये सहभागी व्हा; महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – ॲनिमियामुक्त पिंपरी – चिंचवड शहर करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी  “मिशन अक्षय” (Mishan Akshay) मोहिमेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले. 

पिंपरी चिंचवड शहराला ॲनिमियामुक्त करण्यासाठी महापालिकेच्यावतीने केंद्र आणि राज्य शासनाच्या धर्तीवर शहरात “मिशन अक्षय” (Mishan Akshay) मोहिम सुरु करण्यात आली आहे.  या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कार्यरत असणाऱ्या  महापालिका अधिकारी आणि कर्मचारी तसेच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत  “हिमोग्लोबिन तपासणी” शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीरात सुमारे सातशे पंचेचाळीस (स्त्री- दोनशे पासष्ट, पुरुष- चारशे ऐंशी)  अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवत हिमोग्लोबिन तपासणी केली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आयुक्त पाटील  बोलत होते.  यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, डॉ. शैलजा भावसार, डॉ. सुनिता साळवे, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक , महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, आशा स्वयंसेविका, पत्रकार  आदी उपस्थित होते.

Nirmal Wari : यंदाची वारी निर्मलवारी आणि प्लास्टिकमुक्त वारी व्हावी – आयुक्त पाटील

आयुक्त पाटील म्हणाले, कर्मचा-यांनी दैनंदिन जीवनात कर्तव्य बजावताना आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. रक्तामध्ये हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे ॲनिमिया (Mishan Akshay)  हा आजार जडतो, त्यामुळे कर्माचा-यांच्या आरोग्यावर पर्यायाने कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यासाठी रक्तामध्ये हिमोग्लोबिन आवश्यक प्रमाण राखणे गरजेचे आहे. ॲनिमिया रोगाशी लढण्यासाठी सर्वांनी आपल्या हिमोग्लोबिनची तपासणी करावी. ॲनिमियाचे निदान करून त्यावर योग्य उपचार केल्यास ॲनिमिया बरा होतो. त्यासाठी महापालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी, मानधनावरील कर्मचारी, ठेकेदाराकडील कर्मचारी यांच्या हिमोग्लोबिन तपासणीसाठी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन तपासणी करून घ्यावी.

आज आयोजित केलेल्या ॲनिमिया तपासणी शिबिरात सहभागी अधिकारी, कर्मचारी यांना ॲनिमियामुक्त भारत कार्यक्रमांतर्गत शासन मार्गदर्शक सूचनांनुसार उपचारात्मक जंतनाशक व प्रतिबंधात्मक गोळ्या देण्यात आल्या. तसेच एनिमिक अधिकारी, कर्मचारी यांना उपचारात्मक सेवा देण्यात येणार आहे.  याठिकाणी आयोजित ॲनिमिया तपासणी शिबिरात कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्राच्या माध्यमातून सुमारे १८५ अधिकारी, कर्मचारी यांना बुस्टर डोस देण्यात आले.

 

 

दरम्यान,  महापालिकेच्या सर्व दवाखाना, रुग्णालय स्तरावर “मिशन अक्षय”  (Mishan Akshay) मोहीम राबविण्यात येत आहे.  बालके, किशोरवयीन मुले – मुली, महिला यांच्यामध्ये लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया हा आजार होतो. त्यामुळे त्यांची शारीरिक व बौद्धिक वाढ कमी होते. त्यासाठी “मिशन अक्षय” मोहिमे अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्रामध्ये अंगणवाडी, शाळा, दवाखाने, रुग्णालयांमधून बालकांना, विद्यार्थ्यांना तसेच महिलांना जंतनाशक व प्रतिबंधात्मक गोळ्या देऊन मोहिमेचे उदिष्ट्य साध्य करण्यात येणार आहे. ॲनिमियामुक्त पिंपरी चिंचवड शहर करण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रात सर्वेक्षण करून ॲनिमिया विषयी जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती देखील आयुक्त पाटील यांनी यावेळी दिली.

सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी ॲनिमियामुक्त पिंपरी चिंचवड शहर करण्यासाठी  “मिशन अक्षय”  (Mishan Akshay) मोहिमेमध्ये सहभागी होऊन  “माझे कुटुंब  ॲनिमियामुक्त कुटुंब” करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.