Chakan : बेपत्ता तरुणाचा मृतदेह मिळाला गटारात

महाळुंगे इंगळे येथील प्रकार

एमपीसी न्यूज – तीन दिवसांपूर्वी राहत्या घरातून निघून गेलेल्या एकोणतीस वर्षीय तरुणाचा मृतदेह गटारातील पाण्यात तरंगताना आढळून आला. हा प्रकार महाळुंगे इंगळे ( ता. खेड ) येथे गुरुवारी ( दि. १९ सप्टेंबर ) सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आला आहे.

प्रशांत प्रकाश सिरसाट ( वय – २९ वर्षे, सध्या रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड, मुळ रा. अकोला,) असे मृत तरुणाचे नाव आहे. अश्वजीत अशोक सिरसाट ( वय – ३० वर्षे, रा. महाळुंगे इंगळे,) यांनी याप्रकरणी महाळुंगे इंगळे पोलीस चौकीत फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रशांत हा कामानिमित्त महाळुंगे इंगळे येथे काही दिवसांपूर्वी आला होता. काही दिवस त्याने येथील एका खाजगी कंपनीत रोजंदारीवर काम केले. काम सोडल्यानंतर तो सोमवारी (दि. १६ सप्टेंबर) रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घरातून निघून गेला होता. तेव्हापासून तो घरी आला नसल्याने त्याचे नातेवाईक त्याचा सर्वत्र शोध घेत होते.

प्रशांत याचा शोध घेत असताना गुरुवारी (दि. १९ सप्टेंबर) सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान आंबेठाण रस्त्यावरील महाळुंगे इंगळे गावच्या हद्दीतील शिवकृपा हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या एका नालीतील पाण्यात त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना दिसला. त्यांनी याबाबत महाळुंगे येथील पोलीस चौकीला कळविल्या नंतर पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून उपस्थित नागरिकांच्या मदतीने पाण्यावर तरंगत असलेला प्रशांत याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी चाकण ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान प्रशांत यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे रात्री उशिरापर्यंत निष्पन्न झालेले नाही. त्याच्या मागे पत्नी, एक मुलगा, आई वडील असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.