Pune : हातावर काठीचा फटका मारून रेल्वेतील प्रवाशांचे महागडे मोबाईल चोरणारा गजाआड

12 मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज – हातावर काठीचा फटका मारून रेल्वेतील प्रवाशांचे महागडे मोबाईल चोरणा-या सराईताला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 1 लाख 55 हजार किमतीचे एकूण 12 महागडे मोबाईल जप्त केले.

शाहरुख रशीद खरादी, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रेम तुपधर (वय 18, रा.पुणे स्टेशन) हे रेल्वेच्या जनरल डब्याच्या दरवाजात उभे राहून लोणावळा ते पुणे असा प्रवास करत असताना दोन अज्ञात इसमानी त्यांच्या हातावर काठीचा फटका मारून हातातील 22 हजारांचा मोबाईल चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता,
अशा चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालल्याने खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख हा त्याच्या साथीदारांसोबत, असे गुन्हे करत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार सापळा रचून आरोपी काठी घेऊन शिवाजीनगर येथे रेल्वे ट्रॅकच्या कडेला चोरीच्या तयारीत असताना दिसताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अधिक तपासणी करून पोलिसांनी आरोपीकडून 1 लाख 55 हजार किमतीचे एकूण 12 मोबाईल जप्त केले.

शाहरुख खरादी हा रेकोर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी देखील अशाप्रकारचे दोन गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.