Pune News : पुण्यातही 500 चौरस फुटांपर्यंतच्या मिळकतधारकांना करमाफी द्यावी – मोहन जोशी

एमपीसी न्यूज – सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन पुण्यातही 500 चौरस फुटापर्यंतच्या मिळकत धारकांना महापालिकेने करमाफी द्यावी, अशी मागणी माजी आमदार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी आणि प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

मुंबई महापालिकेने 500 चौरस फुटांच्या घरांचा मिळकत कर रद्द केलेला आहे. त्या धर्तीवर पुणे महापालिकेनेही मिळकत कर रद्द करावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाने यापूर्वीच केलेली होती. महापालिकेतकर सवलतीचा ठरावही मांडला, ठराव मंजूर झाल्यावर राज्य शासनाकडे पाठविला होता. पन्नास हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन तत्कालीन मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते, अशी माहिती मोहन जोशी, संजय बालगुडे यांनी दिली .

गेली दोन वर्षे कोरोनाच्या साथीमुळे लोकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे, त्यातही औषधोपचारांवर बराच खर्च झाला आहे. यातून लोकं अद्याप सावरलेले नाहीत तोच परत कोरोनाची तिसरी लाट ओमायक्रॉन या साथींनी डोकं वर काढलं आहे. या परिस्थितीत पुन्हा निर्बंध येणे अटळ आहे. लोकांच्या हातात पुरेसे उत्पन्न नाही. त्यातच मिळकत कर भरण्याचा बोजा त्यांना सोसवणारा नाही. त्यामुळे 500 चौरस फुटापर्यंतच्या मिळकतीवरचा कर रद्दच करण्यात यावा, अशी मागणी मोहन जोशी आणि संजय बालगुडे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

महापालिकेचे उत्पन्न यंदा डिसेंबर महिन्यातच उद्दीष्टापेक्षाही वाढले आहे. 2021 मध्ये बांधकाम क्षेत्राला चालना मिळाल्याने पालिकेचे उत्पन्न 400 कोटींहून अधिक वाढले असून मार्च पर्यंत ते अधिक वाढेल हे लक्षात घेऊन महापालिका करमाफी देऊ शकते. अशा करमाफीतून महापालिकेवर फार मोठा आर्थिक बोजा पडणार नाही. ही बाब लक्षात घ्यावी, असेही मोहन जोशी, संजय बालगुडे यांनी पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.