Moshi Crime News : कामगाराचा प्रताप! पगार न दिल्याने कंपनीतील 14 वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज – सुपरवायझरने कामगाराला दोन महिन्यांचा पगार दिला नाही. या कारणावरून एका कामगाराने कंपनीच्या आवारात पार्क केलेल्या 14 वाहनांची तोडफोड केली तसेच त्यातील एक वाहन जाळून नुकसान केले. ही घटना शुक्रवारी (दि. 31) रात्री दहा ते शनिवारी (दि. 1) सकाळी सहा वाजताच्या सुमारास मोशी खदान खडीमशीन येथे घडली.

शिवम उपाध्याय (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी श्रवणकुमार सत्यनारायण शहा (वय 44, रा. विठ्ठलनगर, देहू) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शहा हे मोशी खदान खडीमशीन येथील श्री एसेस स्ट्रक्चरल अॅंड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत नोकरी करतात. आरोपी शिभम उपाध्याय हा देखील तिथे काम करतो. शिवम याला त्याच्या सुपरवायझरने दोन महिन्यांचा पगार दिला नाही.

या रागातून त्याने फिर्यादी यांच्या प्लांटमध्ये पार्क केलेले सात डंपर, तीन मिक्सर, एक स्प्रे बाउजर, दोन टेम्पो व एक जनरेटर व्हॅन अशा एकूण 14 वाहनांची तोडफोड केली. तसेच एका टेम्पोची दगडाने तोडफोड करून आग लावली. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पुजारीही तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.