MPC News Special : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी गावी जाताय; पण घर सुरक्षित आहे का?

एमपीसी न्यूज – मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे (MPC News Special) उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी मामाच्या गावाला जाण्यासाठी भाचे मंडळींची लगबग सुरु झाली आहे. त्यातच पालकही उन्हाळी सुट्ट्यांसाठी गावी जाण्याची तयारी करू लागले आहेत. शहरातील घर बंद करून गावाकडच्या घरी धावणाऱ्यांनो आपले घर सुरक्षित केले आहे का? बंद घरांची रेकी करून घरफोड्या करणारे चोरटे या संधीची वाट पाहत आहेत. त्यामुळे गावी जाताना घर आणि घरातील किमती वस्तू, साहित्य, पैसे, दागिने सुरक्षित करूनच घर सोडणे आवश्यक आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात साधी घरे, आलिशान बंगल्यांपासून छोट्यामोठ्या सोसायट्यांचे मोठे प्रमाण आहे. यामध्ये चोरटे शिताफीने हात साफ करत आहेत. भरदिवसा घरफोडीचे प्रमाण चिंताजनक आहे. शहरात चोरटयांनी चार महिन्यात तब्बल 124 घरावर डल्ला मारला आहे. त्यातील 18 चोऱ्या भरदिवसा झाल्या आहेत. मे महिन्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये नागरिकांचे गावाकडे जाण्याचे प्रमाण जास्त असल्याने चोरटे अधिक सक्रिय होतात.

सराईत चोरट्यांच्या टोळ्या किंवा चोरटे चोरी करण्याआधी परिसर किंवा सोसायटीची रेकी करतात. अनेकदा फ्लॅट भाड्याने हवा असल्याची बतावणी करून सोसायटीत प्रवेश करतात. सीसीटीव्ही कोणत्या ठिकाणी आहेत, सुरक्षा उपाययोजना काय आहे याचा अंदाज घेतात. सुरक्षा रक्षकांनी रोखू नये यासाठी काहीवेळा हे चोरटे आरोग्य, लोकसंख्या किंवा पोलिओ डोस अशा वेगवेगळ्या सर्व्हेसाठी आल्याची बतावणी करतात. यावेळी कोणत्या मजल्यावर मजल्यावर कोणते घर बंद आहे याचा अंदाज घेतात, त्यानंतर योजनाबद्ध चोरी करतात.

गावी जाताना, प्रवास करताना तुमच्या मौल्यवान वस्तू, दागिन्यांची काळजी (MPC News Special) घ्या. प्रवासात देखील अनेक ठग, चोरटे तुमचा पाठलाग करण्याची शक्यता असते. बोलण्यात गुंतवून अथवा काहीतरी कारणाने तुमचे साहित्य लंपास होऊ शकते. त्यामुळे प्रवासात साहित्याची काळजी घ्या.

सोशल मिडीयावर स्टेटस ठेवणे पडेल महागात –

गावी जाताना सोशल मीडियावर स्टेटस ठेवणे, स्टोरी बनवणे अशी अनेकांना सवय असते. पण ही सवय तुमच्या अंगलट येऊ शकते. अनेक चोरटे सोशल मीडियावर लक्ष ठेऊन असतात. तुमचे स्टेटस पाहून तुमच्या घरात कोणी नाही याची त्यांना खात्री होते. यामुळे तुमच्या घरी चोरी होऊ शकते. त्यामुळे सोशल मीडियावर स्टेटस ठेवताना, स्टोरी बनवताना काळजी घ्या.

गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अत्यल्प –

मागील चार महिन्यात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि सर्व प्रकारच्या चोरीचे एक हजार पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यातील अवघे काही गुन्हे उघडकीस आले आहेत. उघडकीस येणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण अत्यल्प आहे.

शहरातील चोरीच्या घटना – 

महिनादरोडा जबरी चोरीघरफोडीइतर चोरी
जानेवारी24142236
फेब्रुवारी42530172
मार्च22827211
एप्रिल23525188

 

दररोज होताहेत सरासरी नऊ चोऱ्या –

जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत पिंपरी चिंचवड शहर परिसरात एक हजार 70 चोरीचे गुन्हे दाखल आहेत. हे प्रमाण दररोज नऊ चोऱ्या एवढे भयानक आहे. शहरात दररोज किमान नऊ चोऱ्या होतच आहेत. मागील वर्षी मे महिन्यात वेगवेगळ्या प्रकारच्या चोऱ्यांचे 430 गुन्हे दाखल आहेत. एका महिन्यात तब्बल 39 घरफोड्या झाल्या होत्या. त्या महिन्यातील सरासरी चोरीचे प्रमाण 13 एवढे आहे. मे महिन्यात चोरटे अधिक सक्रीय होत असल्याने नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी.


“पोलिसांची रात्रगस्त आणि नाकाबंदी वाढवली आहे. तसेच कोम्बिंग आणि इतर कारवायांद्वारे सराईत चोरटे आणि गुन्हेगार यांच्यावर कारवाई सुरु आहे. पोलिसांकडून घरफोड्यांबाबत तपास सुरु आहे. काही गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. तसेच नागरिकांनीही घर आणि सोसायटीबाबत सतर्कता आणि योग्य ती काळजी घ्यावी. सुरक्षा रक्षकांनाही योग्य त्या सूचना द्याव्यात.”

– पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे


गावी जाताना अशी घ्या काळजी –

  • घराला अलार्म सिस्टीम बसवा
  • घराल सेफ्टी ग्रील दरवाजा बसवा
  • बाहेर जाताना घरात मौल्यवान वस्तू ठेवू नका.
  • मौल्यवान वस्तू कपाटात न ठेवता इतरत्र गुप्त ठिकाणी ठेवा.
  • बँकेच्या लॉकरमध्ये सोने, पैसे आणि इतर मौल्यवान वस्तू ठेवणे सोयीस्कर असते.
  • बाहेरगावी जाताना शेजार्‍यांना कल्पना द्या.
  • सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, त्यात बिघाड नसल्याची पडताळणी करा
  • सीसीटीव्हीचा डीव्हीआर सुरक्षित ठिकाणी ठेवा
  • सोसायटीमध्ये पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी केलेल्या सुरक्षारक्षकाची नेमणूक करा.
  • घराबाहेर जाताना लॅचलॉकसह मुख्य दरवाजाची कडी व कुलूप लावा
  • बाहेर पर्यटनाला गेल्यानंतर शक्यतो तेथील फोटो सोशल मीडियावर टाकण्याचे टाळा.
  • खूप दिवस बाहेर असल्याचा किंवा कधी येणार आहे याचा उल्लेख टाळा
  • घर, सोसायटीच्या परिसरात संशयित हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या
  • घर, सोसायटीच्या परिसरात रात्रीच्या वेळी पुरेसा उजेड राहील, याचीही दक्षता घ्या

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.