Mulshi Crime News : म्हशींना पाणी पाजण्यावरून झालेला वाद जीवावर बेतला, गोळी झाडून एकाचा खून

एमपीसीन्यूज : मुळशी तालुक्यातील माळीण गावात सोमवारी दुपारच्या सुमारास किरकोळ कारणावरून एकाचा गोळी झाडून खून करण्यात आला. म्हशीला पाणी पाजण्यावरून झालेल्या वादानंतर छर्ऱ्याच्या बंदुकीने गोळी झाडून एकाचा खून करण्यात आला.

अजय अनुराग साठे (वय 40) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बापू लक्ष्मण जोरी (वय 24) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि मयत व्यक्तीमध्ये यापूर्वीही जमिन प्रकरणातून वाद होते. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अजय साठे हा म्हशींना पाणी पाजण्यासाठी ओढ्याच्या दिशेने निघाला होता. यावेळी त्या ठिकाणी पाणी पाजू नये म्हणून दोघांमध्ये वाद झाले.

या वादातून रागाच्या भरात अजय साठे यांनी बापू जोरी याच्या कानाखाली चापट मारली. याचा राग आल्याने बापूने घरी जाऊन छर्ऱ्याची बंदूक आणली आणि अजय साठे याच्यावर गोळी झाडली. यामध्ये अजय हा गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पौड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.