Mumabi : पडद्यावरच्या मदर इंडियाच्या आठवणी, अभिनेत्री नर्गिस यांचा स्मृतीदिन

Memories of mother India on screen, actress Nargis's Memorial Day

एमपीसीन्यूज  : भारतीय स्त्रीची खंबीर प्रतिमा पडद्यावर उभी करणारी अभिनेत्री म्हणजे नर्गिस. त्याआधी आलेल्या अनेक चित्रपटांमध्ये त्या प्रेमिकेच्या रुपात दिसल्या होत्या. पण मदर इंडियात त्यांनी दोन मुलांचा हिंमतीने सांभाळ करणारी खंबीर आई रंगवली. त्याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेल्या एका अपघातातून त्यांना वाचवणा-या सुनील दत्त यांच्याशी त्यांनी विवाह केला आणि नर्गिसच्या त्या निर्मला दत्त बनल्या. आपली ही ओळख पुढे त्यांनी आयुष्यभर जपली.

आज नर्गिस दत्त यांची 91 वी जयंती आहे. 1 जून 1929 रोजी कोलकाता येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे खरे नाव फातिमा राशिद. 1935 साली वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी ‘तलाश-ए-हक’ या सिनेमातून आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली. त्यावेळी त्यांना ‘बेबी नर्गिस’ असे नाव देण्यात आले होते.

नर्गिस हे एका पांढ-याशुभ्र फुलाचे नाव आहे.  40 आणि 50 च्या दशकात त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. बरसात, आवारा, अंदाज, श्री 420, दीदार, चोरी चोरी, मदर इंडिया यासारखे चित्रपट केले. हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका म्हणून नर्गिस यांचा उल्लेख होतो. बॉलिवूडची पहिली ‘क्वीन’ म्हणून नर्गिस दत्त यांना ओळखले जाते.

अभिनेत्री झालेल्या नर्गिस यांना डॉक्टर बनण्याची इच्छा होती. त्या 14 वर्षांच्या असताना दिग्दर्शक महबूब खान यांनी त्यांच्या ‘तकदीर’ या सिनेमात मोतीलाल यांच्या हिरोईनच्या रुपात त्यांची ऑडिशन घेतली होती. कोणतीही समज नसताना नर्गिस यांनी डायलॉग्स वाचले आणि काय आश्चर्य सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला.

सर्वांनी मान्य केले, की नर्गिसच सिनेमाची हिरोईन होणार. तेव्हा त्यांना रडू कोसळले. मात्र, त्यांना सिनेमात येण्याची इच्छा नव्हती. तेव्हाच्या काळात सिनेमात काम करणा-यांना वाईट नजरेने बघितल्या जात होते. नर्गिस यांना आदराचे आयुष्य हवे होते.

पुढे नर्गिस यांनी अनेक चित्रपटात काम केले. ‘मदर इंडिया’, ‘अंदाज’, ‘अनहोनी’, ‘जोगन’, ‘आवारा’ आणि ‘रात और दिन’मध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले. रात और दिन हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यासाठी त्यांना राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला होता.

नर्गिस एकदा म्हणाल्या होत्या, ‘मी सुरुवातीलाच निश्चय केला होता, की लग्न केल्यानंतर सिनेमांमध्ये काम करणे सोडून देईन. कारण फिल्मी आणि खासगी आयुष्य आपण एकत्र जगू शकत नाही.’ सुनील दत्त आणि नर्गिस यांची तीन मुले म्हणजे संजय, नम्रता आणि प्रिया.

त्यांनी नेत्रहीन आणि विशेष मुलांसाठी काम केले. त्या भारतातील पहिल्या स्पास्टिक्स सोसायटीच्या पेट्रन बनल्या. त्यांनी अजंटा आर्ट्स कल्चरल ट्रूप बनवले. त्यामध्ये तेव्हाचे नामवंत अभिनेते आणि गायक सीमेवर जाऊन सैनिकांचे मनोबल वाढवत होते. त्यांचे मनोरंजन केले जात होते.

बांग्लादेश बनल्यानंतर 1971मध्ये त्यांच्या पहिल्या दलाने तिथे परफॉर्म केले होते. नर्गिस दत्त पहिल्या अशा अभिनेत्री होत्या ज्यांना भारत सरकारतर्फे मानाचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. तसेच त्या राज्यसभेच्या खासदार देखील होत्या. त्या पहिल्या अभिनेत्री होत्या ज्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्रींच्या श्रेणीमध्ये राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला.

संजय दत्तचा पहिला सिनेमा ‘रॉकी’चा प्रीमिअर 7 मे 1981 मध्ये झाला होता. त्याच्या चार दिवसांआधीच म्हणजे 3 मे रोजी नर्गिस यांचा मृत्यू झाला. प्रीमिअरवेळी त्यांच्या नावाची एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. 1980 साली त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. न्यूयॉर्क येथे काहीकाळ त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण 3 मे 1981 रोजी त्यांचे निधन झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.