Nigdi : मुंबईतील व्यापाऱ्याच्या मॅनेजरचे आकुर्डीतून अपहरण

Mumbai businessman's manager abducted from Akurdi.

एमपीसी न्यूज – गुंतवणुकीसाठी पैसे घेण्यासाठी मुंबईतून आलेल्या एका व्यापाऱ्याच्या मॅनेजरचे तीन जणांनी अपरहरण केले. त्याला सोडविण्यासाठी 35 लाखांची खंडणीही मागण्यात आली. ही घटना शनिवारी आकुर्डी येथे घडली. तीन दिवसानंतर पोलिसांनी अपहरण झालेल्या मॅनेजरची सुटका करत आरोपींना अटक केली आहे.

राहुल तिवारी (वय 27, सध्या रा. सिल्व्हर सेव्हन हॉटेल, आकुर्डी) असे अपहरण आणि सुटका झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमर कदम, शशांक कदम आणि हरिश राजवाडे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

राजकुमार मनोहरसिंग (वय 43, रा. लोखंडवाला कॉम्प्लेक्‍स, कांदिवली, मुंबई) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजकुमार हे आपले मॅनेजर राहुल तिवारी यांच्यासह आकुर्डीतील सिल्व्हर सेव्हन या हॉटेलमध्ये कामानिमित्त राहण्यासाठी आले होते.

त्यांचा मॅनेजर राहुल तिवारी हा काळेवाडीतील नाना काळे यांच्याकडून गुंतवणूकीसाठी पाच लाख रुपये आणण्यासाठी गेला होता. पैसे आणण्यासाठी गेल्यानंतर राहुलचा फिर्यादी राजकुमार यांना फोन आला. मी पाच लाख रुपये आणले आहेत, मात्र मला वाचवा, असे म्हणून त्यांनी फोन कट केला.

_MPC_DIR_MPU_II

अर्धा तासाने राजकुमार यांनी राहुल यांच्या मोबाइलवर फोन केला असता तो राजकुमार याच्या ओळखीच्या आरोपी अमर कदम याने उचलला. राहूलला सोडायचे असेल तर 35 लाख रुपये द्या, असे म्हणत खंडणीची मागणी केली.

दोन तासांनी पुन्हा राहुल याच्या फोनवरून फिर्यादी राजकुमार यांना फोन आला. आत्ताच्या आत्ता पैसे द्या नाहीतर राहूलला मारून टाकू, अशी धमकी फोनवरून देण्यात आली.

रविवारी सकाळी दहा वाजता पुन्हा राहुल यांच्या फोनवरून फोन आला. त्यावेळी राहुल बोलला की पैशाची व्यवस्था झाली आहे का, शशांक कदम, अमर कदम आणि हरिश राजवाडे ही लोक मला मारून टाकतील. त्यानंतर अमर कदम आणि शशांक कदम हे बोलू लागले. तेव्हा फिर्यादी राजकुमार यांनी पैशाची व्यवस्था करीत असल्याचे आरोपींना सांगितले.

सोमवारी (दि. 12) पुन्हा आरोपींचा फोन आला व त्यांनी पैशाची व्यवस्था झाली का, अशी विचारणा केली. मात्र बॅंकेच्या सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्याचे राजकुमार यांनी सांगितले. माझी माणसे पाठवतो त्यांना पैसे देऊन टाका, असे आरोपींनी सांगितले. खंडणीसाठी वारंवार फोन येऊ लागल्याने अखेर राजकुमार यांनी पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांनी सापळा लावून आरोपींना मंगळवारी पहाटे डांगे चौक परिसतून ताब्यात घेतले. तसेच अपरहण झालेल्या राहुल तिवारी यांची सुखरूप सुटका केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.