Mumbai: कोरोना उपचाराची सज्जता; 1677 त्रिस्तरीय उपचार आणि निगा केंद्रे कार्यरत -राजेश टोपे

राज्यात पावणे दोन लाख आयसोलेशन खाटांची उपलब्धता

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोनासाठी त्रिस्तरीय उपचार आणि निगा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सध्या तीन वर्गवारीतील 1677 उपचार केंद्र असून त्यामध्ये 1 लाख 76 हजार 347 विलगीकरण (आयसोलेशन) खाटांची संख्या आहे. तर, 7248 अतिदक्षता (आयसीयू) खाटांची उपलब्धता आहे. सुमारे तीन हजार व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत. 80 हजाराच्या आसपास पीपीई किटस तर 2 लाख 82 हजार एन 95 मास्क उपलब्ध आहेत, अशा प्रकारे कोरोना उपचाराची सज्जता असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या सूचनांनुसार कोरोनावरील उपचारासाठी तीन श्रेणींमध्ये रुग्णालयांची वर्गवारी केली आहे. श्रेणी- 1 मध्ये अधिकृत कोविड रुग्णालय, श्रेणी- 2 मध्ये अधिकृत कोविड रुग्णालय व निगा केंद्र तर श्रेणी 3 मध्ये कोविड रुग्ण निगा केंद्र यांचा समावेश होतो. या तीनही श्रेणीतील उपचार केंद्रामध्ये तापाचे रुग्ण तपासण्यासाठी फिवर क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत.

कोरोनाबाधीत गंभीर रुग्णांसांठी श्रेणी 1 मध्ये उपचार सुविधा असून सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी श्रेणी 2 मध्ये तर ज्यांना लक्षणे नाहीत अशांसाठी श्रेणी 3 मध्ये उपचार केला जातो. राज्यात श्रेणी 1 चे 246 अधिकृत कोरोना रुग्णालये असून त्यामध्ये एकूण 32 हजार 861 विलगीकरण खाटा आहेत त्यात अतिदक्षता विभागातील खाटांचाही समावेश आहे.

श्रेणी 2 मधील 517 अधिकृत कोरोना रुग्णालय व निगा केंद्र कार्यरत असून त्यामध्ये अतिदक्षता विभागातील खाटा मिळून सुमारे 31 हजार विलगीकरण खाटा आहेत. श्रेणी 3 मधील 914 कोरोना रुग्ण निगा केंद्र कार्यरत आहेत. त्यात 1 लाख 20 हजार 611 विलगीकरण खाटा आहेत.

अशाप्रकारे राज्यात एकूण 1677 रुग्णालये तीनही श्रेणीतील असून त्यात 1 लाख 76 हजार 347 विलगीकरण (आयसोलेशन) खाटा आहेत. त्यामध्ये कोरोना संशयित रुग्णांसाठी 62 हजार 640 तर कोरोनाबाधीतांसाठी 1 लाख 13 हजार 707 विलगीकरण खाटांचा समावेश आहे. या तिनही श्रेणीतील रुग्णालयांसाठी खाटांची, पीपीई, किटस् तसेच व्हेंटीलेटर्सची संख्या पुरेशी आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.