Mumbai News : मुंबईत हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या 14 प्लांटच्या उभारणीस सुरुवात – एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज – ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून ऑक्सिजन तयार करणारे 14 प्लांट मुंबई महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बसविण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार, नवी मुंबई आणि पनवेल या महापालिकांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये हे प्लांट कार्यान्वित होतील, असे मंत्री शिंदे यांनी सांगितले.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. त्यावर मात करतानाच भविष्यात अशा प्रकारचा तुटवडा जाणवू नये यासाठी हवेतून ऑक्सिजन शोषून रुग्णांना पुरविणाऱ्या प्लांटची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

मुंबई महानगर क्षेत्रातील ऑक्सिजनची गरज लक्षात घेता ठाणे महापालिका क्षेत्रात 3, कल्याण डोंबिवली व नवी मुंबई महापालिका क्षेत्रात प्रत्येकी 2 तर भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार आणि पनवेल येथे प्रत्येकी एक प्लांट उभारण्यास सुरूवात झाली आहे. त्यासाठी संस्थांची निवड करून त्यांना कार्यादेशही देण्यात आला. पुढील काही दिवसांमध्ये ते कार्यान्वित होतील, अशी अपेक्षा नगरविकास मंत्री शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

सध्याच्या परिस्थितीत आणि भविष्यातही ऑक्सिजनची गरज भासल्यास या प्लांटमधून निर्माण होणारा ऑक्सिजन त्यासाठी उपयुक्त ठरेल असेही त्यांनी सांगितले. याच धर्तीवर गडचिरोली जिल्ह्यातही दिवसाला एक ते दीड टन ऑक्सिजन निर्मिती करणारे पाच ते सहा प्लांट उभारण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.