Mumbai : कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घ्या – मुख्यमंत्री

Take university exams taking care not to get infected with corona - CM

एमपीसी न्यूज – एकाही विद्यार्थ्याला कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घ्या. त्यासाठी नेमकी परीक्षा पद्धती आणि वेळापत्रक निश्चित करून विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील चिंता संपविण्याच्या दृष्टीने विविध पर्याय पडताळून पहा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, शनिवारी केली.

विद्यापीठांच्या परीक्षा तसेच आगामी शैक्षणिक वर्षाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि मुख्य सचिव अजोय मेहता सहभागी झाले होते.

याप्रसंगी अंतिम वर्षासाठी सर्व वर्षांच्या सत्रांच्या सरासरी इतके गुण किंवा श्रेणी प्रदान करण्याची तसेच श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.

कोरोना विषाणूच्या संकटाला संधी मानून महाराष्ट्रातील प्राथमिक ते उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यातील प्रादेशिक विषमता संपविण्यासाठी प्रयत्न करण्यासह नव्या शिक्षण पद्धतीबाबत संशोधन करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

कोरोनाच्या संकटामुळे सगळ्याच गोष्टी पुढे गेल्या आहेत. अगदी आर्थिक वर्षही पुढे गेले. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरु करायचे याबाबतही विविध प्रस्ताव तयार करणे सुरू आहे. पण, आता परीक्षांबाबतच्या अनिश्चितता संपविण्याचा विषय प्राधान्याने हाताळावा लागणार आहे.

केरळ आणि गोवा राज्यातील परिस्थितीही आटोक्यात आली असे म्हणता म्हणता बदलली. आपल्याकडे मुंबई, पुणे आणि औरंगाबादची परिस्थितीही सतत बदलतेय. त्यामुळे या संकटाचे संधीत रुपांतर करण्यासह त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का, याचा विचार करायला हवा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, नव्याने समीकरणे जुळविण्याची वेळ आली आहे. परीक्षा वेळेवर होऊ शकलेल्या नाहीत म्हणून अनेक हुशार विद्यार्थी चिंतेत असून अनेक पर्यायांचा आणि नेमक्या पद्धतीचा विचार करायला हवा.

परदेशात ज्या पद्धतीने शिक्षण चालते. खास करून विद्यापीठांमध्ये कसे शिकवले जाते. त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्याठिकाणची शिक्षण पद्धती आपल्याकडे कशी आणता येईल, यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत.

ग्रामीण भागातील गुणी विद्यार्थ्याला परिस्थितीमुळे मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी शिकता आले नाही म्हणून अन्याय होऊ नये, अशी व्यवस्था तयार करायला हवी. शिक्षणाचा दर्जा उंचावून त्याला संधी द्यायला हवी. साक्षरतेचे प्रमाण कसे वाढविता येईल, त्या दृष्टीने पाऊले टाकावी लागतील.

आदिवासींपर्यंतही शिक्षणाच्या चांगल्या सुविधा पोहोचविता आल्या पाहिजेत. शिक्षणाचा दर्जा उंचावून तो एकसमान असायला हवा. तो सर्वोत्तमच असायला हवा. महाराष्ट्र शंभर टक्के साक्षर झाला पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली.

यापुढेही अशी संकटे येऊ शकतील. त्याचा विचार करून शिक्षण, उद्योग आणि कार्यालये सुरु राहतील, अशा पद्धती विकसित करा व त्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी वाढविण्याबरोबरच शिक्षण सुलभतेने घरच्या घरी द्यावे लागले तर त्यासाठी ई-लर्निंग, डिजिटल क्लास रूम्स अशा पर्यांयांचाही विचार करण्याची सूचना त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.