Pimpri: पावसाळ्यापूर्वी अटी-शर्तीसह भाजी मंडई मूळ ठिकाणी पुन्हा सुरु करा – अश्विनी चिंचवडे

Resume the vegetable market at its original place with conditions before the monsoon - Ashwini Chinchwade

एमपीसी न्यूज – कोरोनाचा संसर्ग होऊ नये आणि सुरक्षित अंतर राखावे यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने 32 प्रभागात मोकळ्या मैदान-जागामध्ये तात्पुरती स्थलांतरित केलेल्या भाजीमंडई मूळ जागी सुरु कराव्यात. पावसाळ्यापूर्वी अटी-शर्तीसह भाजी मंडई मूळ ठिकाणी पुन्हा सुरु कराव्यात, अशी मागणी शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे-पाटील यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात चिंचवडे यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात पालिकेने 32 प्रभागातील मोकळ्या मैदान-जागांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात भाजीपाला मंडई सुरु केल्या आहेत. भाजी मंडईत गर्दी होते, म्हणून मोकळ्या मैदान-जागामध्ये भाजीपाला विक्री करणे हा मुख्य उद्देश होता.

परंतू, चुकीची ठिकाणे निवडल्यामुळे आणि रस्त्यावर ठिक-ठिकाणी हातगाडी, ठेले, पथारीवाले मास्क न वापरता सुरक्षित अंतर न पाळता भाजीपाला, फळेविक्री करत आहेत. त्यांच्यावर प्रशासन नियंत्रण ठेवण्यास कमी पडत आहे. त्यामुळे पालिकेच्या तात्पुरत्या भाजीपाला विक्री केंद्राकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.

महापालिकेने लॉकडाऊनमध्ये अनेक व्यवसाय, दुकानांना अटी-शर्तीसह परवानगी दिली. तसेच कोणाच्या तरी दबावाला बळी पडून  शहरातील केशकर्तनालय, सलून सुरु करण्यात आली आहेत.

या ठिकाणी विषाणूचा संसर्ग वाढू शकतो. परंतू, भाजीपाला या जीवनावश्यक वस्तूंची नागरिकांच्या सोयी-सुविधांबाबत निर्णय घेतला गेला नाही हे दुर्दैव आहे.

लवकरच पावसाळा सुरु होत आहे. त्यामुळे मोकळ्या मैदान-जागामध्ये छत नसल्याने पाऊस आल्यास भाजीपाला विक्रेत्यांची व नागरिकांची गैरसोय होईल. ऐनवेळी तात्पुरती भाजीपाला केंद्र बंद पडतील.

त्यामुळे लवकरच मूळ भाजी मंडईच्या ठिकाणी योग्य ती नियमावली अटी-शर्ती सह पुन्हा सुरु करण्याचा  निर्णय घ्यावा, अशी विनंती नगरसेविका चिंचवडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.