Nashik News: शहरातील 39.5 टक्के नागरिकांमध्ये आढळल्या कोरोना अँटीबॉडीज

एमपीसी न्यूज – नाशिक महापालिकेने औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने केलेल्या कोविड-19 अँटीबॉडी (प्रतिपिंड) सर्वेक्षणात शहरातील 39.5 टक्के नागरिकांमध्ये कोरोना अँटीबॉडी (प्रतिपिंड) आढळून आल्या.

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दि. 9 ते 11 जानेवारी 2021 या कालावधीत औरंगाबाद शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील डॉ. के. वाय. येळीकर व डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. आवेश पलोड व डॉ. प्रशांत शेटे यांनी तांत्रिक कामकाज केले.

या तपासणीमध्ये 18 वर्षावरील एकूण 2352 नागरिकांची तपासणी करण्याचे निश्चित करणेत आले होते. त्यानुसार एकुण 2355 व्यक्तींचे रक्त नमुने गोळा करणेत आले होते.

शहरातील सर्व 6 विभागांमधील नागरिकांचे लोकसंख्येच्या प्रमाणात विभागणी करून झोपडपट्टी व बिगर झोपडपट्टी क्षेत्रातील रक्तनमुने घेण्यात आले.

शहरातील एकूण तपासलेल्या नमुन्यांपैकी 39.50% नागरिकांमध्ये कोरोना विरूद्ध प्रतिपिंड (अँटीबॉडी) आढळून आल्या. त्यापैकी झोपडपट्टी क्षेत्रामध्ये – 42.07% व बिगर झोपडपट्टी क्षेत्रामध्ये – 38.12% इतके प्रमाण होते.

शहरातील नवीन नाशिक (सिडको) विभागामध्ये सर्वात जास्त म्हणजेच 42.66 %, नाशिक पूर्व 42.07 % इतके आहे. इतर विभागांमध्ये 34.31 % ते 39.01 % इतके प्रमाण आढळून आले.

झोपडपट्टी भागात 31 ते 40 वर्ष या वयोगटात 45.08 % व बिगर झोपडपट्टी भागात 61 ते 70 वर्ष या वयोगटात 44.57 % असे सर्वात जास्त प्रमाणात प्रतिपिंड (अँटीबॉडी) आढळून आल्या. अँटीबॉडी आढळलेल्या मध्ये पुरूषांमध्ये 39.95 % व महिलांमध्ये 39.13 % प्रमाण आढळले.

अकुशल कामगारांमध्ये सर्वात जास्त प्रमाण 45.21 % तर व्यावसायिकांमध्ये (डॉक्टर, वकील, प्राध्यापक इ.) सर्वात कमी 31.67 % प्रमाण आढळले.

एकूण अँटीबॉडी सापडलेल्या व्यक्तींमध्ये 78.81 % व्यक्तींचा कोणत्याही कोविड-19 रूग्णाच्या संपर्कात आल्याचा पूर्व इतिहास नव्हता तर 15.15 % व्यक्ती कोविड-पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आलेल्या होत्या व 5.05 % व्यक्तींना कुठलाही इतिहास आठवत नाही.

प्रतिपिंड (अँटीबॉडी) सापडलेल्या व्यक्तींपैकी 36.99 % व्यक्तीना हृदयविकार, 35.45 % व्यक्तींना उच्च रक्तदाब, 34.04 % लोकांना मधुमेह, 39.83 % कोणताही आजार नसलेले तर 28.07 % लोकांमध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक आजार होते.

एकूण 2355 व्यक्तींपैकी 517 व्यक्तींची अँटीजेन तपासणी करण्यात आलेली होती. त्यापैकी 170 व्यक्ती अँटीजन तपासणी मध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या होत्या. परंतु 170 पैकी फक्त 105 व्यक्तींमध्ये अँटीबॉडी (प्रतिपिंड) आढळून आल्या. त्याबरोबरच 134 व्यक्ती अँटीजन मध्ये निगेटिव्ह होत्या परंतु त्यांच्यामध्ये अँटीबॉडी आढळून आल्या आहेत.

अशाप्रकारे अँटीबॉडी आढळलेल्या आणि अँटीबॉडी न आढळलेल्या परंतु कोविड-19 चाचणी सॅम्पल घेतलेल्या एकूण 2355 पैकी 996 रूग्ण म्हणजेच 42.29 % इतके प्रमाणात  नागरिकांमध्ये कोविड-19 आजाराची लागण झाली असल्याचे निदर्शनास येते.

..तरीही कोरोना प्रतिबंधक त्रिसूत्री कटाक्षाने पाळावी – आयुक्त कैलास जाधव
या अहवालामध्ये कोविड-19 प्रतिपिंड (अँटीबॉडी) प्रतिकारशक्ती तयार झालेली असल्याचे आढळले असले तरी नाशिक शहरातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये कुठलीही ढिलाई दाखवू नये. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना त्रिसूत्री मास्क वापरणे, नियमित हात स्वच्छ धुणे, सॅनिटायजरचा वापर करणे व सामाजिक अंतर राखणे या गोष्टी यापुढेही कटाक्षाने पाळण्याचे आवाहन महानगरपालिका आयुक्त श्री. कैलास जाधव यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.