Nashik News :  कोविड-19 च्या काळात आरोग्य शास्त्रातील विद्यार्थ्यांचे कार्य महत्त्वपूर्ण – राज्यपाल

एमपीसी न्यूज – कोविड-19 च्या काळात आरोग्य शास्त्रातील विद्यार्थ्यांचे कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा ऑनलाईन विसाव्या दीक्षान्त समारंभाप्रसंगी केले. ते या समारंभास ऑनलाईन उपस्थित होते.

या समारंभास कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखा अधिकारी नरहरी कळसकर, विद्यापीठ विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या दीक्षांत समारंभातील अध्यक्षीय भाषणात कुलपती तथा राज्यपालभगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले की, कोविड-19 आजाराच्या परिस्थितीत आरोग्य शिक्षणातील सर्व विद्याशाखांनी एकत्र येऊन आरोग्य विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय काम केले याबद्दल मला अभिमान आहे. आरोग्य आणि शिक्षण या मुलभूत गोष्टींने समाजाचा विकास होतो. या गोष्टी दर्जेदार होण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे. कोविड-19 च्या परिस्थितीत आरोग्य विद्यापीठाने विविध विद्याशाखांच्या परीक्षा यशीस्वीरित्या घेतल्या याबद्दल विद्यापीठाचे त्यांनी कौतुक केले. आरोग्य क्षेत्रात जास्तीत जास्त संशोधन कार्य करुन नाशिक हे तीर्थक्षेत्रासमवेत आरोग्य विद्यापीठ हे संशोधनाचे केंद्र बनवून त्याचा जागतिक ठसा उमटवावा असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, आयुर्वेद आणि योग शास्त्र मानवी आरोग्यासाठी व उचरासाठी महत्त्वपूर्ण आहे, यासाठी या शास्त्रांतील संशोधनात अधिक महत्त्वपूर्ण कार्य करावे असे त्यांनी सांगितले. प्रशासकीय कामकाज व परीक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर मोठया प्रमाणात करावा जेणेकरुन पेपरलेस कामकाज करता येईल आणि पर्यावरणाचेही रक्षण होईल असे त्यांनी सांगितले.

दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विद्यापीठाचा अहवाल सादर करताना सांगितले की, कोविड – 19 विषाणू आजारासंदर्भात जनजागृतीकरिता विद्यापीठातर्फे संलग्नित महाविद्यालयांच्या वतीने व्हीडीओ द्वारे जनजागृती, मास्क वाटप, आरोग्य सेतु अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी जनजागृती करणे, रोगप्रतिकारक औषधांचे वाटप व इतर उपक्रम राबविले. अवयदान करण्यासाठी विविध उपक्रम विद्यापीठाकडून घेण्यात आले.

यामध्ये निबंधस्पर्धा व पोस्टर पेंटींग करणे आदी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला. यावर्षाच्या राजपथावरील पथसंचालनात विद्यापीठाच्या संलग्नीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता हे गौरवास्पद आहे. विद्यार्थी विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यापीठ प्राधिकरणांचे सदस्य तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या अनुषंगाने कोविड सुरक्षा योजना लागू केली आहे. कोविड-19 या महामारीच्या कालावधीत विद्यार्थ्यांचा ताण कमी व्हावा यासाठी आंतरवासिता प्रशिक्षण प्रमाणपत्राचे महाविद्यालयीन स्तरावर विकेंद्रीकरण, ऑनलाईन प्रक्रिया यासारखे विद्यार्थींकेंद्रित निर्णय विद्यापीठार्फे घेण्यात आले आहेत.

ते पुढे म्हणाले की, विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी निगडीत असलेले प्रलंबित अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते लवकरच मार्गी लागतील यासाठी विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार अमित देशमुख यांचे मार्गदर्शन व सहकार्य महत्वपूर्ण आहे. विद्यापीठ आवारात लवकरच वैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी अभ्यासक्रमाची विद्यापीठाची महाविद्यालये सुरु करण्यासाठी प्रस्ताव सादर केलेले आहेत. याबाबत शासनाकडे कार्यवाही सुरु असून काम अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचा विसाव्या ऑनलाईन दीक्षांत समारंभाचे विद्यापीठाच्या अधिसभागृहात सकाळी 11.00 वाजता प्रारंभ झाला. या समारंभात विविध विद्याशाखांच्या पदवीका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या 8064 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या आहेत. विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना 85 सुवर्णपदक विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने सुवर्णपदक व संशोधन पूर्ण केलेल्या 03 विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली.

शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील उत्तीर्ण पात्र विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभात पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे 517, दंत विद्याशाखा पदवीचे 1926, आयुर्वेद विद्याशाखेचे 726, युनानी विद्याशाखेचे 80, होमिओपॅथी विद्याशाखेचे 943, पीबी बी.एस्सी. नर्सिंग विद्याशाखेचे 509, बी.पी.टी.एच. विद्याशाखेचे 134, बी.ओ.टी.एच. विद्याशाखेचे 13, बी.ए. एस.एल.पी. विद्याशाखेचे 34, बी.पी.ओ. विद्याशाखेचे 03, डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री विद्याशाखेचे 03, पदव्युत्तर विद्याशाखेमध्ये एम.डी.मेडिकल विद्याशाखेचे 1051, एम.एस.मेडिकल विद्याशाखेचे 673, डी.एम.मेडिकल विद्या एम.सी.एच. मेडिकल विद्याशाखेचे 67, पी.जी.डिप्लोमा विद्याशाखेचे 262 आदी विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पदवी प्रदान करण्यात आली आहे.

या कार्यक्रमात मा. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी पदवीदान करणेबाबत मान्यवरांना विनंती व आभार मानले.

या कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. या दीक्षांत समारंभाचे  https://t.jio/MUHS2021 वरुन थेट प्रक्षेपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपणास मोठया प्रमाणात विद्यार्थी, शिक्षक, पालक व अभ्यागत उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.