Nashik News : दोन ग्रामपंचायती वगळून बाकी सर्व ग्रामपंचायतीत बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज – देवळा तालुक्यातील मौजे उमराणे व येवला तालुक्यातील मौजे कातरणी या दोन ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडून येत असलेल्या उमेदवारांव्यतिरिक्त जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायातीमधील उमेदवार बिनविरोध निवडून आले असल्याची घोषणा करण्याची परवानगी निवडणूक आयोगामार्फत देण्यात आली आल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले.

उमराणे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व सदस्य या पदांचा लिलाव झाल्याबाबत अहवाल सादर करण्यात आला होता. तसेच येवला तालुक्यातील मौजे कातरणी या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये सदस्य पदाच्या लिलावसह प्रभाग क्रमांक 1 मधील अनुसूचित जाती (स्त्री) या पदासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत इतर उमेदवारांवर दबाव आणल्याबाबत निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर करण्यात आला होता. या दोन्ही ग्रामपंचायतींच्या सर्व सदस्य पदांसाठीची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून रद्द करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये सदस्य पदासाठी लिलावासारखा अनुचित प्रकार आणि न्यायालीयन प्रकरणे दाखल झालेली नाहीत, असे जिल्हाधिकारी, सर्व संबंधीत तहसिलदार आणि निवडणूक निरिक्षक यांच्याकडून निवडणूक आयोगास कळविण्यात आले आहे. इतर ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या निवडणूकांमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची घोषणा करण्यात यावी, असे निवडणूक आयोगाने पत्राद्वारे कळविले असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.