Pimpri News : सत्ता टिकवण्यासाठी गुजरातच्या वीज कंपनीपुढे भाजपचे लोटांगण – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातून मोठमोठ्या कंपन्या गुजरातला पाठविल्यानंतर आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना वेठीस धरण्याचे उद्योग भाजपकडून सुरु आहेत. (Pimpri News) त्यामुळेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्याऐवजी भारतीय जनता पक्षाने गुजरातच्या टोरेंटया खाजगी वीज पुरवठा कंपनीपुढे पायघड्या पसरवल्या आहेत. महाराष्ट्राची मान केंद्रापुढे आणि गुजरातपुढे तुकवून सत्ता टिकवण्यासाठी लाचारी पत्करून पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांना वेठीस धरले जात असल्याची टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली.  

महावितरणच्या खाजगीकरणास विरोध दर्शविण्यासाठी नुकतेच महावितरणच्या कर्मचारी आणि अभियंत्यांनी संप पुकारला होता. त्यांच्या तोंडाला आश्वासनांची पाने पुसून लागलीच गुजरातच्या खाजगी वीज कंपन्यांपुढे पायघड्या पसरणाऱ्या राज्य सरकारच्या निर्णयावर गव्हाणे यांनी एका पत्रकाद्वारे तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ‘उपाशी’ ठेवत  गुजरातच्या कंपनीला ‘तुपाशी’ करण्यात मग्न असलेल्या भाजप नेत्यांचा सत्तेचा हा ‘सोस’ पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना नाहक सोसावा लागणार असल्याचा टोला गव्हाणे यांनी पत्रकातून लगावला.

Moshi News: ‘कन्स्ट्रो 2023 इंटरनॅशनल एक्सपो’ प्रदर्शन

वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावर वीज कर्मचाऱ्यांचा संप आणि त्यांना मिळालेल्या आश्वासनाचा मुद्दा ताजा असतानाच गुजरातच्या अहमदाबाद शहरातील टोरेंट कंपनीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी वीज वितरण करण्याचा परवाना मागितला आहे. सध्या या भागात महावितरणकडून वीज वितरण करण्यात येते. टोरेंटला परवानगी मिळाल्यास महावितरणबरोबर ही कंपनीही शहरात वीज वितरणात उतरेल. टोरेंट पॉवर लिमिटेड या कंपनीने त्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज कायद्यानुसार अर्ज दाखल केला असून तो आयोगाने स्वीकारला आहे. त्यावर नागरिकांच्या हरकती, सूचना मागविण्यात आल्या आहेत.

अर्जात नमूद केल्यानुसार या कंपनीचे पुणे जिल्ह्यात वीज वितरणाचा परवाना मिळाल्यापासून पाच वर्षांत सहा लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देणार असल्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला खिळखिळं करण्याचा भाजप नेत्यांचा डाव असल्याचे सांगत अजित गव्हाणे पुढे म्हणाले की, शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क आणि टाटा एअरबस (Pimpri News) असे तीन मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातेत पाठविण्यात आलेत. या प्रकल्पामुळे इथल्या तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला असता. मात्र केंद्राची मर्जी सांभाळण्यासाठी राज्याला वाऱ्यावर सोडणाऱ्या बेफिकीर राज्यकर्त्यांनी आता महावितरणासोबतच पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या वीज ग्राहकांनाही वेठीला धरल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यासाठी अहितकर निर्णय घेणाऱ्या भाजप नेत्यांना आता इथले नागरिक येत्या निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही गव्हाणे यांनी पत्रकातून दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.