New Delhi : देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत 1409ची वाढ; 388 रुग्ण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज : देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत  असून, गेल्या 24 तासात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत 1409 ने वाढ झाली आहे, तर 388 कोरोनाचे रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर जवळपास 19 टक्के  कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली.

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 21 हजार 393 जणांना कोरोनाची बाधा झाली, तर कोरोनामुळे आतापर्यंत 681 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात 16 हजार 454 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 4257 कोरोनाबाधित रुग्ण या आजरातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशातील 78 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. त्याचबरोबर गेल्या 28 दिवसात तब्बल 12 जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही, मागील आठवड्यात हा आकडा 4 होता.

देशात लॉकडाऊनला आता एक महिना पूर्ण झाला आहे. या महिनाभरात देशात जवळपास पाच लाख कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. सध्या जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे. आतापर्यंत केलेल्या पाच लाख चाचण्यांमध्ये जवळपास 21 हजार नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झाले.

असे असले तरी कोरोना व्हायरसचा ट्रान्समिशन आणि डबलिंग रेट कमी करण्यात शासनाल यश आल्याचे लव अग्रवाल यांनी सांगितले. आज देशात 736 रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णावर उपचार केले जात आहे. या रुग्णालयामध्ये एकूण 1 लाख 94 हजार बेड्सची व्यवस्था असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.