New Delhi News : राज्यसभेचे पीठासीन अधिकारी म्हणून कामकाजाची संधी मिळणं हे भाग्य : वंदना चव्हाण

राज्यसभा उपसभापतींच्या पॅनेलमध्ये निवड झाल्यानंतर शुक्रवारी (दि. 18 सप्टेंबर) देशातील सर्वोच्च सभागृहाचे पीठासीन म्हणून कामकाज करण्याची संधी खासदार वंदना चव्हाण यांना प्रथमच मिळाली.

एमपीसी न्यूज – राज्यसभेचे पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहण्याची संधी मिळणं हे माझे भाग्यच आहे. सभागृहाच्या या महान परंपरेचे वैभव व गरिमा अबाधित ठेवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल” अशी भावना खासदार ॲड. वंदना चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्यसभा उपसभापतींच्या पॅनेलमध्ये निवड झाल्यानंतर शुक्रवारी (दि. 18 सप्टेंबर) देशातील सर्वोच्च सभागृहाचे पीठासीन म्हणून कामकाज करण्याची संधी खासदार वंदना चव्हाण यांना प्रथमच मिळाली. सभापतींच्या खुर्चीत विराजमान होताना सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले.

राज्यसभेचे कामकाज आज शुक्रवारी सकाळी नऊ वाजता सुरू झाले. साडेदहाच्या सुमारास चव्हाण पीठासीन अधिकारी म्हणून विराजमान झाल्या, सभागृहात चालू असलेल्या चर्चेदरम्यान त्यांचे सभागृहात आगमन होताच सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर काही वेळ चव्हाण यांनी सभागृहाचे कामकाज पहिले.

देशाचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती व्यैंकय्या नायडू यांनी जुलै महिन्यात उपसभापती यांच्या पॅनेल मध्ये नविन सहा सदस्यांची निवड केली होती. सर्व सदस्य वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधीत्त्व सभागृहात करतात.

सभागृहातील कामगिरी, अनुभव आणि ज्येष्ठता या निकषांवर सहा सदस्यांची निवड सभापती करतात. त्यानुसार यावर्षीच्या पॅनेलमध्ये खासदार वंदना चव्हाण यांचा समावेश यामध्ये करण्यात आला.

“भारतीय लोकशाहीचा गाभारा असलेल्या राज्यसभेच्या सभागृहात अनेक महान नेत्यांनी आपले योगदान दिले आहे. गेली 8 वर्षे देशाच्या या सर्वोच्च सभागृहात सदस्य म्हणून काम करत आहे. प्रमुख मार्गदर्शक व नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी राज्यसभेवर जाण्याची संधी दिली.

सभागृहात अनेक महत्वांच्या विधेयकांवरील चर्चांमध्ये सहभागी झाले, यावेळी मी केलेल्या काही सूचनांचा समावेश संबंधित विधेयकांत झाला याचा विशेष आनंद आहे. तर विविध घटकांचे प्रश्न सभागृहात मांडता आले आणि यामुळे काही अंशी का होईना त्यांना न्याय देता आला याचे समाधान आहे.

त्याचसोबत संसदीय समितींच्या मार्फत प्रतिनिधित्व करत असताना नानाविविध विषयांचे आकलन झाले. विधेयक निर्णय प्रक्रियेत सहभागी होता आले. या सर्वांची परिणीती म्हणजे सतत सभागृहात कार्यमग्न राहाता आले.

आता सभागृहात पीठासीन अधिकारी म्हणून अधिकची जबाबदारी यानिमित्ताने मला पार पाडावी लागणार आहे याची कल्पना आहे. वैभवशाली परंपरा असलेल्या राज्यसभेचे पीठासीन म्हणून कामकाज पाहण्याची संधी मिळणं हे मी माझे भाग्य समजते. सभागृहाच्या या महान परंपरेचे वैभव व गरिमा अबाधित ठेवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल” अशी भावना खासदार वंदना चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.