Pune : रिपब्लिकन जनशक्तीला सत्तेचा वाटा मिळवून देणार – डॉ. नीलम गोऱ्हे 

एमपीसी न्यूज – दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवशक्ती -भीमशक्ती संकल्पनेत त्यावेळीही सहभागी होणारे तसेच आजही शिवसेनेबरोबर युतीत असणारे आंबेडकरी चळवळीचे नेते, साहित्यिक अर्जुन डांगळे यांच्या रिपब्लिकन जनशक्तीला येत्या विधानसभा निवडणुकीत आणि सत्तेत सहभागी करण्यासाठी आग्रह धरणार असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती व शिवसेनेच्या उपनेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी जनशक्तीच्या कार्यकर्ता मेळाव्यात आश्वासन दिले.

पुढे त्या म्हणाल्या की मागासवर्गीय महामंडळमधून महिलांसाठी स्वतंत्र योजना सुरू करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. या बरोबरच दलित महिलांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी मी सदैव कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल जनशक्तीच्या वतीने डॉ. नीलम गोऱ्हे यांचा नागरी सत्कार अर्जुन डांगळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन जनशक्तीचे प्रदेश अध्यक्ष शैलेंद्र मोरे उपस्थित होते.

यावेळी रिपब्लिकन जनशक्तीचे संस्थापक अर्जुन डांगळे म्हणाले की येत्या विधानसभा निवडणुकीत सेनेने आमच्या पक्षला किमान 5 जागा सोडण्याची मागणी केली. त्यामध्ये श्रीरामपूर, धारावी, देवळाली, फलटण आणि भोर या मतदार संघाचा समावेश आहे.  प्रदेशअध्यक्ष शैलेंद्र मोरे यांनी आपल्या प्रास्तविकात रिपब्लिकन जनशक्तीने केलेल्या कार्याचा आढावा सांगितला शिवाय काही पदाधिकाऱ्यांना नवीन जबाबदारी देण्यात आली. या मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रातून रिपब्लिकन जनशक्तीचे महिला युवक आणि प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.