New York: अमेरिकेत कोरोनाचा मोठा प्रकोप! एका दिवसांत तब्बल 2804 कोरोनाबाधितांचा मृत्यू

अमेरिकेतील कोरोना बळींचा आकडा 45 हजार 318 वर, मंगळवारी दिवसभरात जगात सात हजारहून अधिक मृत्यू

एमपीसी न्यूजजागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत कोरोना विषाणूचा काल (मंगळवार) आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रकोप पाहायला मिळाला. काल (मंगळवारी) एका दिवसात कोरोनाबाधित तब्बल 2 हजार 804 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. हा आतापर्यंतचा एका दिवसातील कोरोना बळींचा विक्रम आहे. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाच्या एकूण बळींचा आकडा 45 हजार 318 इतका झाला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्यांच्या संख्येने आठ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्यानंतरही कोरोनाचा प्रसार व बळींची वाढती संख्या नियंत्रित करण्यात यश येत नसल्याने अमेरिका मेटाकुटीला आल्याचे पाहायला मिळत आहे.  

अमेरिकेत कोरोनाबाधितांचे यापूर्वी 15 एप्रिलला 2,618 मृत्यू झाले होते. तो नरसंहाराचा विक्रम काल मोडला गेला. 14 व 17 एप्रिलला एका दिवसात अडीच हजारांपेक्षा अधिक बळी गेल्याची नोंद आहे. 14 एप्रिलला 2,553 तर 17 एप्रिलला 2,528 जण मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर एका दिवसातील मृतांची संख्या 1,561 पर्यंत खाली आल्याने थोडा दिलासा मिळाला होता. मात्र कोरोना मृत्यूंच्या संख्येने एकदम उसळी घेतल्याने केवळ अमेरिकेच्याच नव्हे तर संपूर्ण जगातील लोकांच्या पोटात भीतीचा गोळा निर्माण झाला आहे.

जगातील कोरोनाबाधितांपैकी 32.05 टक्के कोरोनाबाधित हे एकट्या अमेरिकेत आहेत. एकूण कोरोनाबाधितांची संख्या 8 लाख 18 हजार 744 इतकी असून आतापर्यंत 45 हजार 318 जणांचा मृत्यू झाला असून 82 हजार 923 जण कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेत अजून 6 लाख 90 हजार 503 इतके सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 14 हजार 016 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेत मंगळवारी मृतांचा आकडा 2800 च्या पुढे पोहचल्याने अमेरिकेत सर्वांची झोप उडाली आहे.

अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये कोरोना महामारीचा सर्वात मोठा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत 2 लाख 56 हजार 555 कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा 19 हजार 693 पर्यंत वाढला आहे. काल (मंगळवारी) न्यूयॉर्कमध्ये एका दिवसात 764 कोरोना बळी गेेले आहेत. न्यूयॉर्क पाठोपाठ न्यू जर्सीचा क्रमांक लागतो. न्यू जर्सीमध्ये एकूण कोरोनाबाधितांची संख्या 92 हजार 387 झाली असून बळींची संख्या 4,753 पर्यंत जाऊन धडकली आहे. मिशीगनमध्ये मृतांचा आकडा 2,700 इतका झाला आहे. मॅसेच्युसेट्स, ल्युसियाना, कॅलिफोर्निया, , फ्लोरिडा, पेनसिल्वानिया, इलिनोइस, वॉशिंग्टन, जॉर्जिया, टेक्सास आदी शहरांमधील परिस्थिती गंभीर आहे. 

अमेरिकेत कोरोनामुळे परिस्थिती ढासळत चालल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वोतोपरीे प्रयत्न सुरू असून लवकरच अमेरिका कोरोनावर मात करील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता धैर्याने संकटाशी मुकाबला करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मृत्यूंचे थैमान – 7,062 बळी! मंगळवारी एका दिवसांत गेलेले कोरोना बळी!

अमेरिका – 2 हजार 804

यू. के. – 828

इटली – 534

फ्रान्स – 531

स्पेन – 430

जर्मनी – 224

स्वीडन – 185

बेल्जियम – 170

नेदरलँड – 165

ब्राझील – 154

कॅनडा – 144

टर्की – 119

इराण – 88

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.