Pimpri: ‘कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संघटना, खासगी संस्थामार्फत होणाऱ्या औषध फवारणीला प्रतिबंध घाला’

उन्मुक्त युवा संघटनेची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही संघटना, संस्था, युवा प्रतिष्ठान यांच्यामार्फत केल्या जाणा-या औषध फवारणीत सोडियम हायपोक्लोराईट, बॅक्टोडेक्स पाण्यात मिसळण्याचे प्रमाण योग्य आहे का?, फवारण्यासाठी वापरण्यात येणा-या पाण्याचा दर्जा, औषध बनावट तर नाहीत ना, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे या खासगी संघटना, संस्थामार्फत केल्या जाणा-या फवारणीला प्रतिबंध घालण्याची मागणी उन्मुक्त युवा संघटनेने केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका अतिशय प्रभावी उपाययोजना करत आहे. यामुळे मागील दहा दिवसात शहरात एकही नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत संपुर्ण शहरात औषध फवारणी करण्यात येत आहे. परंतु, काही संघटना, युवा प्रतिष्ठान, स्वयंसेवी संस्था स्वखर्चाने औषध फवारणी करत आहेत. हे होणे अपेक्षित नाही.

फवारणी करताना सोडियम हायपोक्लोराईट, बॅक्टोडेक्स हे पाण्यात मिसळण्याचे प्रमाण त्यांना माहिती आहे का?, फवारण्यासाठी वापरण्यात येणा-या पाण्याचा दर्जा, औषध बनावट तर नाहीत ना, असे विविध प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.  हे प्रश्न योग्यच आहेत. असेच सुरु राहिले तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे संघटना यांना फवारणी करण्यास प्रतिबंध घालावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.