Nigdi : मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांना पाठिंब्यासाठी भक्ती-शक्ती चौकात कॅंडल मार्च

एमपीसी न्यूज – मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे, यासाठी (Nigdi) अंतरवली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दर्शविण्यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निगडी येथील भक्ती शक्ती चौकात कॅंडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. या मार्चमध्ये अबालवृद्धांसह तरुण व महिलांनी मोठ्या संख्यने सहभाग घेतला होता.

यावेळी उपोषणकर्ते आणि आंदोलकांच्या वतीने भक्ती शक्ती येथील संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज याच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून या कॅंडल मार्चची सुरुवात करण्यात आली. टाळ-मृदंग, मेणबत्या आणि मशाली घेत हा मार्च भक्ती शक्ती स्मारकाला तीन फेऱ्या मारून उद्यानाच्या बाहेर मार्गक्रमण करत भक्ती शक्ती चौकात विसर्जित झाला. यावेळी अनेक सहभागी आंदोलकांनी विचार मांडले. तसेच ‘एक मराठा, लाख मराठा’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या.

उद्या सकाळी 10 वाजता चिंचवड गावातील संत मोरया गोसावी विसर्जन घाटावर सरकारचे प्रतीकात्मक श्राध्द घालण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे. यावेळी उद्या शहरात चक्का-जाम करण्याबाबत सकल मराठा समाजाच्या वतीने निर्णय घेण्यात येणार असल्याचेही अयोजकांनी सांगितले.

यावेळी बोलतांना सामाजिक कार्यकर्ते मारोती भापकर म्हणाले, माझ्यासह शहरतील सर्व मराठा समाजाच्या 31 नगरसेवक, आमदार,खासदार यांनी कुणबी असल्याचे दाखले काढून घेतले आहे. त्यामुळे या मार्च मध्ये कोणीही उपस्थित झाले नाहीत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यातील विविध भागातील पुढा-यांनी राजीनामा दिला आहे. शहरातील अण्णा, दादा, अप्पा, ताई हे कधी राजीनामा देणार आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी खासदार हेमंत गोडसे यांचा राजीनामा; आंदोलकांच्या प्रश्नावर तात्काळ प्रतिसाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परवा शिर्डी येथे आले होते, मराठा समाज त्यांच्या भाषणाकडे मोठी आशा लाऊन बसला होता. मात्र त्यांनी (Nigdi) आपल्या भाषणात मराठ्याचा म देखील उच्चारला नाही. मराठा समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. प्रसंगी जेल भरो आंदोलन करण्याची तयारी ठेवावी लागेल. तसेच लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलने करण्याची तयारी ठेवावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.