Nigdi Crime News: नोकराने मालकिणीला कोयत्याचा धाक दाखवून घरातून सव्वादोन लाखांचा ऐवज पळवला

एमपीसी न्यूज – दुध देण्याच्या बहाण्याने नोकर आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी मालकिणीच्या घरात प्रवेश केला. मालकीण आणि तिच्या घरातील सदस्यांना कोयत्याचा धाक दाखवून घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि अन्य साहित्य असा एकूण दोन लाख 25 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 12) पहाटे साडेपाच वाजता यमुनानगर, निगडी येथे जीवनधारा हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली.

स्मिता रमेश औताडे (वय 32, रा. जीवनधारा हाऊसिंग सोसायटी, यमुनानगर, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी किरण बोरा (वय 25) आणि त्याचे दोन अनोळखी साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण बोरा हा फिर्यादी यांच्या घरी नोकर म्हणून काम करत होता. शनिवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास किरण आणि त्याचे दोन साथीदार दुध देण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्या घरात आले. त्यांनी फिर्यादी स्मिता आणि त्यांच्या कुटुंबियांना कोयत्याचा धाक दाखवून कोयत्याने उलट्या बाजूने मारले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

आरोपींनी घरातून एक लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, 50 हजार रुपयांच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, 25 हजारांची रोकड, 20 हजारांची कारची चावी, 30 हजारांचे घड्याळ असा एकूण दोन लाख 25 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.