Nigdi : दिवंगत पत्नीच्या नावाने बनावट प्रतिज्ञापत्र बनवून वाढीव बांधकाम करणा-या पती विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – दिवंगत पत्नीच्या नावाने बनावट प्रतिज्ञापत्र बनवून शासनाकडून वाढीव बांधकामाची परवानगी घेतली. त्याआधारे वाढीव बांधकाम केले. या वाढीव बांधकाम करणा-या पती विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार निगडी प्राधिकरण आणि प्राधिकरण कार्यालयात घडला.

पोलीस उपनिरीक्षक (परिविक्षाधीन) राजेश भारत मोरे यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कृष्णलाल जगन्नाथ बुद्धिराजा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णलाल याची पत्नी अविनाश कृष्णलाल बुद्धीराजा यांचा 1 ऑगस्ट 2005 रोजी मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर बुद्धिराजा पतीने आपली बुद्धी वापरून 29 फेब्रुवारी 2012 रोजी पत्नीच्या नावाने स्टॅम्प पेपरवर वाढीव बांधकामासाठी प्रतिज्ञापत्र तयार केले. हे प्रतिज्ञापत्र त्याने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कार्यालय आकुर्डी येथे सादर केले. आरोपी बुद्धिराजा याला प्राधिकरण कार्यालयातून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाले. त्याद्वारे त्याने वाढीव बांधकाम करून शासनाची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.