Nigdi News : आकुर्डीचे स्टार हॉस्पिटल पुन्हा एकदा चर्चेत; कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतरही आयसीयूच्या बिलात वाढ

आयसीयूचे भाडे वाढवून घेतल्याबाबत हॉस्पिटलच्या संचालक, कॅशियर विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – नगरसेवक जावेद शेख यांच्या मृत्यूनंतर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेले आकुर्डीतील स्टार हॉस्पिटल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर देखील मयत रुग्णाच्या नातेवाईकांकडून आयसीयूचे वाढीव भाडे घेतल्याबाबत हॉस्पिटलचे संचालक आणि कॅशियर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संचालक डॉ. अमित वाघ आणि कॅशियर (नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुस्तफा अब्दुल गफार तांबोळी (वय 19, रा. भांगरे कॉलनी, पाटीलनगर, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तांबोळी यांच्या आई मुमताज अब्दुल गफार तांबोळी (वय 37) यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांचा त्रास वाढल्याने त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले. उपचार सुरु असताना तांबोळी यांच्या आईचा 24 ऑगस्ट रोजी रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.

24 ऑगस्ट रोजी रात्री सव्वादहा वाजता तांबोळी यांच्या आईला डॉक्टरांनी मयत घोषित केले. तरीही हॉस्पिटल प्रशासनाने हॉस्पिटलच्या बिलात 25 ऑगस्ट पर्यंतचे बिल बनवले. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बिल बनवून पैसे स्वीकारणा-या अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांच्याकडून व्हेंटीलेटरचे 9 हजार रुपये वाढीव बिल स्वीकारले. याबाबत हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमित वाघ आणि 25 ऑगस्ट रोजी तांबोळी यांचे बिल बनवून पैसे स्वीकारणा-या इसमाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुस्तफा तांबोळी यांनी यापूर्वी देखील कोरोनावरील इंजेक्शन रेमडीसीवीरची चढ्या दराने विक्री करणा-या तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्यातील एकजण आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटलमध्ये काम करत होता. त्याच्याकडे औषध विक्रीचा कोणताही परवाना नसताना त्याने रेमडीसीवीर या इंजेक्शनची वाढीव दराने विक्री केली होती.

दरम्यान, नगरसेवक जावेद शेख यांच्या मृत्यू प्रकरणात देखील स्टार हॉस्पिटल चर्चेत आले होते. नगरसेवक शेख यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या पत्नीने पोलिसांना स्टार हॉस्पिटल प्रशासनाच्या विरोधात तक्रार अर्ज दिला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.