Nigdi News: नगरसेवक अमित गावडे, श्री समर्थ युवक प्रतिष्ठान, श्रीनिवास विहार मित्र मंडळातर्फे पूरग्रस्तांना मदत

एमपीसी न्यूज  – शिवसेना नगरसेवक अमित गावडे, श्री समर्थ युवक प्रतिष्ठान आणि श्रीनिवास विहार मित्र मंडळातर्फे पुरामुळे नुकसान झालेल्या कोकणातील चिपळूणमधील नागरिकांना संसारोपयोगी साहित्याची मदत करण्यात आली. त्यात ताट, वाट्या, भांडी, ग्लास, पातेली, पोळपाट, लाटणे, परात आणि तवा या भांड्याचा समावेश होता. लहान मुलांसाठी स्कूल बॅग, वह्या हे शालापोयोगी साहित्य दिले.

ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने कोकणातील खेड, दापोली, महाड, चिपळूण यासह कोकणच्या अनेक गावातील हजारो नागरिकांचे संसार उद्धवस्त झाले. हे संसार उभे करणे मोठे आव्हान आहे. त्यासाठी प्रत्येकजण आपल्या परीने मदत करत आहे. शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांनी एक हात मदतीचा हा उपक्रम राबविला. प्रभागातील नागरिकांना पूरग्रस्तांसाठी संसारोपयोगी साहित्य देण्याच्या मदतीच्या केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. अनेकांनी संसारोपयोगी साहित्य देऊन खारीचा वाटा उचलला.

नगरसेवक अमित गावडे आणि त्यांचे सहकारी ही सर्व मदत घेऊन कोकणात गेले. चिपळूण शहर, बाजारपेठ, शंकरवाडी, मिरझोई, कोंडे ग्रामपंचायत, पेटमाज, भुरटेआळी, समर्थनगर या भागातील नागरिकांना संसारोपयोगी साहित्य दिले.

राजू जगदाळे, अविनाश जमदाडे, सचिन नागपुरे, सचिन धुमाळ, कृष्णा माळवे, सिद्धांत देशमुख, निलेश जांभळे, निकेश ताकवणे, किरण सोमासे, साईनाथ समुद्र, रोहित गोविलकर, करण कोठावळे, मयूर दोरगे यावेळी उपस्थित होते.
या मदतीबद्दल गावक-यांनी नगरसेवक गावडे,  श्री समर्थ युवक प्रतिष्ठान, श्रीनिवास विहार मित्र मंडळाचे आभार मानले.

”अतिवृष्टीमुळे कोकणवासीयांचे फार मोठी हानी झाली.  घरात पाणी घुसल्यामुळे अतोनात नुकसान झाले. या पूरग्रस्त बाधित कुटुंबांना नव्याने संसार उभारण्यासाठी ही मदत दिली”, असे नगरसेवक अमित गावडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.