Nigdi : रुपीनगर, तळवडे परिसर उद्यापासून चार दिवस कडकडीत ‘बंद’

एमपीसी न्यूज – निगडी-रूपीनगर परिसरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झपाट्यानेा वाढत आहे. या परिसरातील आजपर्यंत 25 ते 30 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हा परिसर ‘हॉटस्पॉट’ झाला आहे. यामुळे प्रभाग क्रमांक 12 रुपीनगर, तळवडे परीसर पुढील चार दिवस कडकडीत बंद राहणार आहे. नागरीकांकडून उद्या गुरुवार 30 एप्रिल ते रविवार 3 मे दरम्यान कडकडीत पाळण्यात येणार आहे. बंद मध्ये फक्त रूग्णालये, औषध विक्रीची दुकाने खुली राहणार आहेत. इतर सर्व दुकाने, व्यवसाय बंद ठेवण्यात यावीत, असे आवाहन स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून करण्यात आले आहे.

रुपीनगर येथील स्थानिक नागरिक,लोकप्रतिनिधी यांनी प्रशासनासोबत चर्चा करून आज (बुधवारी) याबाबत ठराव केला आहे. चिखली पोलीस ठाणे अंतर्गत रुपीनगर पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नकुल न्यामणे यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

रुपीनगर , सहयोगनगर, त्रिवेणीनगर ,ताम्हाणे वस्ती , ज्योतिबानगर, तळवडे आदी परिसरात पूर्णपणे कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय रुपीनगर ,तळवडे परिसरामधील नागरीकांनी घेतलेला आहे. सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगरसेवक प्रवीण भालेकर, नगरसेवक पंकज भालेकर, नगरसेविका संगीता ताम्हाणे, पौर्णिमा सोनवणे यांनी केले आहे.

दरम्यान, रूपीनगरमध्ये कोरोनाग्रस्त व संशयित रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. ही बाब चिंताजनक आहे. दाट लोकवस्तीच्या ठिकाणी कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन सर्व प्रशासकीय यंत्रणा करीत आहेत.

तसेच विनाकारण रस्त्यावर फिरत असलेल्या नागरिकांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. बंदचे पालन न केल्यास अधिक कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.