Nitin Desai : नितीन दादांनी बॉलीवूडमध्ये मराठी माणसाची मान उंचावली – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या एन डी स्टुडीओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने मराठी चित्रपट सृष्टीसह बॉलीवूडला देखील मोठा धक्का बसला. नितीन देसाई (Nitin Desai) यांच्याबद्दल प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भावना व्यक्त केल्या. नितीन दादांनी बॉलीवूडमध्ये मराठी माणसाची मान उंचावली. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला खूप मोठा धक्का बसला असल्याचे त्यांनी म्हटले.

Loyola Football : दोन गटातून लॉयला, तर एका गटात बिशप्स प्रशाला विजेते

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पहिली मालिका पूर्ण करण्याचे शिवधनुष्य दादांनी पेललं होतं. फायटिंग स्पिरीट असलेल्या माणसाच्या बाबतीत अशी बातमी ऐकायला मिळणं हे धक्कादायक आहे.

बॉलीवूडमध्ये मराठी माणसाची मान उंच करण्याचे काम त्यांनी अनेक वर्ष केले. एन डी स्टुडीओ सारखं भव्यदिव्य स्वप्न त्यांनी पाहिलं. बॉलीवूडमध्ये आर्ट डिरेक्शन आणि प्रोडक्शन डिझाईनमध्ये मराठी पताका रोवण्याचे काम त्यांनी केले.

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या दुर्दैवी निधनाची बातमी माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे. या बातमीवर अजिबात विश्वास बसत नाहीये. कला क्षेत्रातील माझ्या आजवरच्या प्रवासात मला लाभलेले नितीन दादांचे मार्गदर्शन आणि त्यांची साथ माझ्यासाठी खूप मोलाची ठरली आहे.

ज्या ‘राजा शिवछत्रपती’ मालिकेत मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली, त्या मालिकेचे निर्माते नितीन दादाच होते. त्यांच्या अचानक जाण्याने मनात पोरके झाल्याची भावना निर्माण झाली आहे, असेही डॉ. कोल्हे म्हणाले.

नितीन देसाई यांचा जन्म 9 ऑगस्ट 1965 रोजी दापोली येथे झाला. प्रसिद्ध कला दिग्दर्शक, निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून त्यांनी काम केले. परिंदा, डॉन, माचिस, देवदास, लगान अशा अनेक सुपरहिट चित्रपटांचे कला दिग्दर्शन त्यांनी केले आहे. प्रसिद्ध असलेल्या एन डी स्टुडीओची उभारणी त्यांनी केली. त्याच स्टुडीओमध्ये त्यांचा शेवट झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.