Pune Crime News : पुण्यात मनसे शहराध्यक्षासह 800 जणांना नोटीस

एमपीसी न्यूज- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चार मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासंदर्भातील अल्टिमेटम दिला होता. तो अल्टिमेटम आज संपत आहे. त्यामुळे राज्यात अनुचित प्रकार टाळण्यासाठी 30 हजारहून अधिक होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. तर आतापर्यंत राज्यभरातील 13 हजार लोकांना 149 ची नोटीस देण्यात आली आहे. कोणताही कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी आज पत्रकार परिषदेत दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातही मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

दरम्यान राज्यभरातील मनसेचा कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विविध कलामांतर्गत पोलिसांनी नोटीसा पाठवल्या आहेत. पुणे शहरात 700 ते 800 मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा आल्या आहेत. यामध्ये शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचाही समावेश आहे. या सर्व नोटीसांना मनसेच्या लीगल सेलमार्फत कायदेशीर उत्तर देण्यात येईल असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान पोलिसांच्या नोटीस आल्यानंतर आणि पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश आल्यानंतर शहरातील मनसेचे अनेक कार्यकर्ते परागंदा झाले आहेत. दरम्यान पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राज्यभर जी कार्यवाही सुरु आहे तीच कार्यवाही पुणे शहरातही सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.