Pimpri News : अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर टाटा मोटर्स कंपनीत वेतनवाढ करार; कामगारांचा मोठा जल्लोष

एमपीसी न्यूज – साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर टाटा मोटर्स कंपनीत वेतनवाढ करार झाला आहे. टाटा मोटर्स व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये आर्थिक वर्ष सन 2022 ते 2026 या चार वर्षांच्या कालावधीकरीता झालेल्या दीर्घकालीन वेतनविषयक करारावर व्यवस्थापन व कामगार संघटना अशा दोहोंकडून आज (मंगळवारी) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यानुसार कामगारांना 16 हजार 800 रुपये वाढ मिळणार आहे. करारानंतर कामगारांनी कंपनीत जल्लोष केला.

या कार्यक्रमाला टाटा मोटर्सचे वरिष्ठ अधिकारी, युनियन पदाधिकारी, प्रतिनिधी आणि बहुसंख्येने कर्मचारी उपस्थित होते. वेतनवाढ करारात चार वर्षांच्या कालावधीत निश्चित वेतनवाढ 16 हजार 800 रुपये विभागून देण्यात आली. उम्पादनक्षमतेचे मापन म्हणून HPev (एचपीईव्ही) या जागतिक परिमाणावर, गुणवत्तेचे मापन – डीआरआर आणि सक्रिय सुरक्षा मापदंड याच्यावर आधारीत ‘व्हेरिएबल पे’ योजना जाहीर केली.

ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष ए. बी. लाल म्हणाले की, ‘मी व्यवस्थापन आणि युनियन या दोन्ही कमिटीचे दीर्घकालीन वेतनविषयक करार वेळेवर आणि सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन करतो. या करारामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मी पुणे प्लांटला सर्वतोपरी यश चितंतो आणि अनेक वर्षांपासून निर्माण झालेले परस्पर सहकार्य आणि विश्वासाचे संबंध दृढ करण्यासाठी दोघांनाही शुभेच्छा देतो.

युनियनचे अध्यक्ष सचिन (भैय्या) लांडगे म्हणाले, ‘हा वेतनविषयक करार सर्वांसाठी आशादायी आहे. युनियन आणि कामगार खूप आनंदी आहेत. टाटा मोटर्सचे नेतृत्वाचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी दोघेही कठोर परिश्रमाचे योगदान सतत चालु ठेवतील’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.