Pimpri : आता सुडाचे राजकारण म्हणता, अगोदर धर्माचे, न्यायाचे होते का? – उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज – चुकीची कामे केल्यावर चौकशीचा ससेमिरा लागणारच आहे. चौकशीला न बोलविता ‘ईडी’ कार्यालयात चालले होते. चौकशीची आवश्यकता असल्यास बोलविण्यात येईलच. त्यावर सुडाचे राजकारण केले जात असल्याचे म्हणतात. मग, मुंबईतील 1992-93 च्या दंगलीप्रकरणी 2000 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांना नाहक अटक केली. तेव्हा धर्माचे, न्यायाचे राजकारण होते का? असा सवाल उपस्थित करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. तसेच ‘ईडी’शी लढले. अन्यायाविरुद्ध लढलेच पाहिजे, असेही ते म्हणाले.  

पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम संघटना आणि रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्या प्रचारार्थ आज (शुक्रवारी) पिंपरीतील आयोजित सभेत ठाकरे बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, संपर्क प्रमुख बाळा कदम, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, डॉ. रघुनाथ कुचिक, महायुतीचे चिंचवडचे उमेदवार लक्ष्मण जगताप, महापौर राहूल जाधव, शिवसेना राज्य संघटक गोविंद घोळवे, अर्जुन डांगळे,  सह संपर्कप्रमुख इरफान सय्यद, शिवसेना जिल्हाप्रमुख गजाजन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका उर्मिला काळभोर, सदाशिव खाडे, अमित गोरखे,  सभागृह नेते एकनाथ पवार, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे,  राजेश पिल्ले, बाबू नायर, जितेंद्र ननावरे, यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीला विरोधी पक्ष थोडा हालचाल करत होता. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादीतील लोक भाजप-शिवसेनेत येत आहेत. त्यामुळे आता काँग्रेस संपली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे दार चालू आहे. दुस-या पक्षातील कोण गळाला लागते का याची वाट बघतात. परंतु, कोण गळाला लागणार नसून समोर विरोधक नसल्यामुळे टीका करायची कोणावर असा प्रश्न पडला असल्याचे सांगत ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राने ठरविले आहे. युतीचेच सरकार येणार आहे. जनता आता 24 तारखेची वाट बघत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला पुन्हा एकदा घरी पाठविण्यासाठी उत्सूक आहे.

ठाकरे म्हणाले, विरोधकांचे टार्गेट आम्ही असू तर आम्ही पळपूटे नाहीत. उलटा वार करणारच. आम्ही सत्तेसाठीच करत आहोत. आम्हाला सत्ता हवीच आहे. गोरगरिबांची कामे करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे. सत्तेच्या माध्यमातून सातबारा कोरा करणार आहोत. शेतक-यांना कर्ज मुक्त करणारच हे युतीचे वचन आहे. 15 लाख सुशिक्षित तरुणांना शिष्यवृत्ती देणार आहे. शहरातील झोपडपट्टीचा प्रश्न सोडविला जाईल.

मजबुतीने एकत्र आलोत!

शिवसेना-भाजप युतीमधील कुरबुरी संपल्या आहेत. मजबुतीने एकत्र आलो आहोत. त्यामुळे युतीत गद्दारी, बंडखोरी, दगाबाजी चालणार नाही. प्रामाणिकपणे मित्र पक्षांचे काम करायचे आहे. येणारे सरकार आनंदाने कारभार करेल, असेही ठाकरे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.