Chinchwad News : महापालिका ठेकेदार मस्त, अधिकारी सुस्त, नागरीक त्रस्त – अश्विनी चिंचवडे

आयुक्तांनी करावी 'ब' प्रभागातील विकास कामांची पाहणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सुरु असलेल्या कामांचा वेग अतिशय मंद आहे. स्थापत्य, ड्रेनेज, पाणीपुरवठा 24X7, स्मार्ट सिटी, विद्युतची कामे करताना अधिकारी वर्गांमध्ये समन्वय नाही. कामे दर्जेदार आणि मुदतीत होत नाहीत. पालिका ठेकेदार व सल्लागारांवर नियंत्रण नाही. ठेकेदार मस्तवाल झाले असून अधिकारी सुस्त आहेत. त्यामुळे करदाते नागरिक त्रस्त असल्याचे टीकास्त्र शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे-पाटील यांनी केले आहे. तसेच ‘ब’ प्रभागातील कामांची आयुक्तांनी पाहणी करण्याची मागणीही त्यांनी केली.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेविका चिंचवडे यांनी म्हटले आहे की, पिंपरी- चिंचवड महापालिकेची विकास कामे ठिकठिकाणी सुरू आहेत. ‘ब’ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत देखील विविध कामे सुरु आहेत. काम करणा-या ठेकेदार व सल्लागारांवर अधिकाऱ्यां चे कोणतेही नियंत्रण नाही. रामभरोसे काम सुरू आहेत असे निदर्शनास येत आहे.

चिंचवडमध्ये श्री मोरया मंदिर परिसर, पवनानगर, रस्टन कॉलनी , शिवाजी मंडळ, तानाजीनगर, पागेची तालीम, मारुती मंदिर याठिकाणी चालू असलेली कामे संथगतीने सुरु आहेत. पाण्याची लाईन फुटणे, विद्युत केबल तुटणे यामुळे दोन-दोन दिवस लाईट नसणे. सध्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे जर पाण्याची लाईन फुटली. तर, तीन-तीन दिवस पाणी नागरिकांना मिळत नाही. रस्त्यावर राडारोडा असल्यामुळे जेष्ठ नागरिक, महिला भगिनी, लहान मुलांचे अपघात होतात.

तसेच खोदाई, राडारोडा, धुराळ्यामुळे श्वसनाचे आजार वाढत आहेत. करदात्या नागरिकांना विविध समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. अधिकारी वर्गाचे ठेकेदाराच्या दैनंदिन कामावर लक्ष नाही. त्यामुळे विकासकामे करारनामा, शेड्युल व मुदतीत होत नाहीत. दर्जाहीन कामे होत आहेत. ठेकेदार व सल्लागार महापालिकेचे मालक असल्याप्रमाणे मस्तवालपणे काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नियंत्रण क्षेत्रातील सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करावी. संबधित अधिकारी व ठेकेदार यांना कडक सूचना द्याव्यात, अशी विनंती नगरसेविका चिंचवडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.