Lonavala News : पाचव्या आंतरराष्ट्रीय लोणावळा चित्रपट महोत्सवाचे ऑनलाईन आयोजन

एमपीसी न्यूज : मागील पाच वर्षापासून लोणावळा शहरात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय लोणावळा चित्रपट महोत्सवाचे (लिफा) हे पाचवे वर्ष आहे. यावर्षी कोरोना संकट काळामुळे या महोत्सवाचे थेट आयोजन न करता तो ऑनलाईन पद्घतीने करण्यात येणार आहे. 11 ते 13 डिसेंबर या दरम्यान सायं. 6 वाजता या महोत्सवाचे ऑनलाइन आयोजन करण्यात येणार आहे.

महोत्सवातून एन. एन. सिप्पी यांना विशेष श्रद्धांजली अर्पण करत त्यांचे काही सर्वोत्तम चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. महोत्सवाचे संचलन माधव तोडी आणि संकल्पना व आखणी विवेक वासवानी यांनी केली आहे. तसेच अनंत महादेवन, संगीतकार जोडी आनंद-मिलिंद, प्रवेश सिप्पी, दिव्य सोलगामा यासारख्या नामवंतांचा विविध सत्रात सहभाग होणार आहे. प्रत्येकी एक चित्रपट ऑनलाइन प्रदर्शित केला जाईल आणि महोत्सव कालावधीत एकूण 9 हिंदी चित्रपट तसेच वेगवेगळ्या भाषांमधील 4 ते 5 लघुपट दाखविले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

प्रेक्षकांना घरातील आरामदायी वातावरणात बसून चित्रपट विनामूल्य पाहता येतील आणि त्यानंतर होणाऱ्या चर्चासत्रांमध्येही सहभागी होता येईल.

त्यासाठी प्लेक्सिगो (यूएफओ मूव्हीजचे एक अंग)  हे मोबाईल अॅप त्यांना www.onelink.to/Plexigo या बेवसाईट वर जाऊन डाऊनलोड करावे लागेल. चित्रपट महोत्सवासंबंधी अधिक माहिती www.liffi.in या संकेतस्थळाला भेट देऊन आणि फेसबूक:

www.facebook.com/LIFFIIndia

येथून मिळविता येईल.

लिफी आपल्या पाचव्या वर्षातील आवृत्तीत उत्कृष्ट चित्रपट निर्माते आणि वितरक एन. एन. सिप्पी यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे आणि त्यांच्या वो कौन थी, गुमनाम, देवता, सरगम, फकिरा, चोर मचाए शोर आणि अन्य काही उत्कृष्ट चित्रपटांचे प्रदर्शन करणार आहे. या व्यतिरिक्त ‘पापा कहते है’ सारखा चित्रपट आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा लाभलेला ‘मुक्ती भवन’ हा चित्रपटही दाखविला जाईल.

लिफी महोत्सवाचे संचालक माधव तोडी म्हणाले, “आम्ही विद्यमान साथीच्या फैलावामुळे यावर्षी हा उत्सव ऑनलाईन पद्धतीने आयोजित केला आहे. रंजक चित्रपट, तज्ज्ञांबरोबर परस्पर-संवादी चर्चा आणि कार्यशाळांच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचा प्रयत्न आम्हाला निरंतर सुरू ठेवायचा आहे. यावर्षी आम्ही भौतिक आवृत्ती आयोजित करू शकत नाही, तरीही आम्ही प्रत्येकासाठी त्यांच्या घरातील आरामदायी वातावरणात कुटुंबासह आनंद घेण्यासाठी प्रत्येकाला मनोरंजनात्मक निवडीचे पर्याय देऊन एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.