Pimpri: पवना धरणात पाणीसाठा अत्यल्प; आत्तापासूनच पाणीकपात गरजेची – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरणात पाणीसाठा सिमित आहे. त्यामुळे आत्तापासूनच पाणीकपात करणे आवश्यक आहे. अन्यथा उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होईल. भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये. त्यासाठी धरणातील साठा पाहता आणि एकंदर गरज पाहता आत्तापासूनच टप्या-टप्याने पाणीकपात गरजेची असल्याचे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. अन्यथा, भविष्यात जास्त पाणीकपात करावी लागेल. पाणी कपातीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी बैठक घेण्याबाबत महापौर राहुल जाधव यांना पत्र दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणात आजमितीला 59.80 टक्के पाणीसाठा असून हा साठा गतवर्षीपेक्षा 10 टक्के कमी आहे. हा पाणीसाठा 15 जूनपर्यंत पुरेल एवढाच मर्यादित आहे. त्यामुळे पावसाने ओढ दिल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची वेळ येणार आहे. पवना धरणातून दिवसाला 480 एमएलडीऐवजी 440 एमएलडीच पाणी उचलण्याचे सक्त आदेश पाटबंधारे विभागाने 4 ऑक्टोबर 2018 रोजी झालेल्या बैठकीत महापालिकेला दिले होते. त्याचवेळी दहा टक्के पाणी कपात करण्याचे निर्देश दिले होते.

परंतु, महापालिकेने पाणी उचलणे कमी केले नाही. आजदेखील महापालिका पवना धरणातून दिवसाला 490 दश लक्ष लिटर (एमएलडी) पाणीउपसा करता. त्यामुळे धरणातील पाणीसाठा दिवसें-दिवस झपाट्याने कमी होत चालला आहे. त्यामुळे शहरवासियांना भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”पवना धरणात पाणीसाठा सिमित आहे. त्यामुळे आत्तापासूनच टप्या-टप्याने पाणीकपात करणे आवश्यक आहे. अन्यथा उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होईल. भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये. त्यासाठी धरणातील साठा पाहता आणि एकंदर गरज पाहता आत्तापासूनच टप्या-टप्याने पाणी कपात करावी लागणार आहे. अन्यथा, भविष्यात जास्त पाणी कपात करावी लागेल. पाणी कपातीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी महापौर राहुल जाधव यांना पत्र दिले आहे. त्यानुसार गटनेत्यांची बैठक घेऊन लवकरच पाणीकपात संदर्भात निर्णय घेतला जाईल”.

यावेळी पवना धरणाचे शाखा अभियंता ए.एम. गडवाल म्हणाले, ”पवना धरणात आजमितीला गतवर्षीपेक्षा 10 टक्के पाणीसाठा कमी आहे. हा पाणीसाठा 15 जूनपर्यंत पुरेल एवढाच मर्यादित आहे. 4 ऑक्टोबर 2018 रोजी कालवा समितीच्या झालेल्या बैठकीत महापालिकेला 10 टक्के पाणीकपात करण्याचे सक्त निर्देश दिले होते. तसेच धरणातून 480 ऐवजी 440 एमएलडीच पाणी उपसा करण्यात यावे, अशी सूचनाही महापालिकेला केली होती. परंतु, महापालिका आजदेखील 490 एमएलडी पाणी उपसा करते. त्यामुळे आत्तापासूनच पाणी कपात करणे गरजेचे आहे. अन्यथा, भविष्यात जास्त पाणीकपात करुन पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. महापालिकेने याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे”.

  • आजमितीला पवना धरणाची काय आहे परिस्थिती?
    पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण यंदा ऑगस्ट महिन्यात 100 टक्के भरले होते. परंतु, त्यानंतर पावसाने ओढ दिली. परतीच्या पावसाने देखील दडी मारली. परिणामी, नदीपात्राऐवजी पावसाळ्यातच धरणातून पाणी उपसा करावा लागला. त्यामुळे धरणातील साठा कमी होत गेला. आजमितीला धरणात 59.80 टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा 15 जूनपर्यंत पुरेल एवढाच मर्यादित आहे. गतवर्षी आजच्या तारखेला पवना धरणात 70.40 टक्के पाणीसाठा होता. म्हणजेच यंदा गतवर्षीपेक्षा धरणात तब्बल 10 टक्के पाणीसाठा कमी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.