PCMC : डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप आजारांचा प्रादुर्भाव वाढतोय, काळजी घ्या; आयुक्तांचे आवाहन

एमपीसी न्यूज – शहरात डेंग्यू, चिकुनगुनिया तसेच हिवताप यांसारख्या किटकजन्य (PCMC) आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या अनुषंगाने किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या दवाखान्यात तपासणी करून घ्यावी, आठवड्यातून किमान 1 कोरडा दिवस पाळावा, घरातील पाणी साठ्याची  भांडी आठवड्यातून किमान एकदा रिकामी करून घासुन, पुसून कोरडी करून  वापरावीत, पाण्याचे साठे घट्ट झाकणांनी बंद करावेत, घराच्या परिसरातील किंवा घराच्या छतावरील निरूपयोगी वस्तू नष्ट कराव्यात तसेच डासांपासून व्यक्तिगत सुरक्षिततेसाठी मच्छरदाणीचा वापर, डास प्रतिरोध क्रिमचा वापर, घर व परिसर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

औद्योगिक, बांधकाम आस्थापना, कार्यालये, गृहसंस्था, घरे तसेच व्यावसायिक दुकानांसह सर्व आस्थापनांनी आपल्या ठिकाणी असलेली डास उत्पत्ती स्थळे तात्काळ नष्ट करावीत, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला असून शहरात सुरू असलेल्या विविध बांधकामाच्या साईटवर महापालिकेने विशेष लक्ष केंद्रित आहे.

विविध भागांची तपासणी करून संबंधितांना नोटीसा बजावण्यात येत आहेत, शिवाय अशी किटकजन्य ठिकाणे आढळून आलेल्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाईसुद्धा करण्यात आली आहे. किटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक असून डासांची उत्पत्ती होणारी स्थळे प्राधान्याने नष्ट करणे (PCMC) गरजेचे आहे. यासाठी महापालिकेने मोहीम हाती घेतली असून विशेष पथकांचीदेखील प्रभागनिहाय नेमणूक करण्यात आली आहे.

या पथकामार्फत नियमितपणे तपासणी आणि कारवाई करण्यात येत आहे. पथकांमध्ये आवश्यक असलेले मनुष्यबळ वाढविण्यात आले आहे. किटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी तपासणीसाठी आल्यास त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच कीटकजन्य रोगांचा प्रसार टाळण्यासाठी बांधकामाधीन ठिकाणांसह निवासी आणि व्यावसायिक आस्थापनांनी सर्व आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.

घराच्या आत आणि बाहेर स्वच्छ पाण्याने भरलेल्या कंटेनरमध्ये डासांची उत्पत्ती होत असते, शिवाय घरातील फ्लॉवर-पॉट, मनी प्लांट्स आणि फ्रीज ड्रिप पॅनमधील पाण्यात देखील अशी उत्पत्ती आढळून येते. त्यामुळे या ठिकाणांची नागरिकांनी नियमितपणे तपासणी केली पाहिजे.

महापालिकेच्या रुग्णालयांत तसेच दवाखान्यांमध्ये डेंगूच्या तपासणीकरिता आवश्यक असलेले रॅपिड किट उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. किटकजन्य रोग नियंञणासाठी स्वच्छ पाण्यात गप्पी मासे सोडणे, नागरिकांच्या घरांच्या कंटेनरचे सर्वेक्षण, व्यवसायाच्या ठिकाणांचे सर्वेक्षण केले जात आहे.

डेंग्यूची लक्षणे-

तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायुदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, डोळ्यांच्या आतील बाजुस दुखणे, अंगावर पुरळ, अशक्तपणा, भुक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे. त्वचेखाली, नाकातून रक्तस्त्राव होणे व रक्ताची उलटी होणे, रक्तमिश्रित/काळसर रंगांची शौचास होणे, पोट दुखणे, रक्तदाब कमी होणे, हातपाय थंड होणे. काही रुग्णांमध्ये या दरम्यान रक्तजलाचे प्रमाण कमी होऊन रुग्ण अस्वस्थ होतो, रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो या गंभीर बेशुद्ध अवस्थेला डेंग्यू शॉक सिंड्रोम असे म्हणतात आणि यामध्ये मृत्युचे प्रमाण जास्त असते.

चिकनगुनियाची लक्षणे- PCMC

कमी मुदतीचा ताप, डोके दुखी, अंगदुखी, तीव्र सांधेदुखी, अंगावर पुरळ आढळून येणे. ही सर्व लक्षणे 7 ते 10  दिवसांसाठी असतात.

हिवतापाची लक्षणे-

थंडी वाजुन ताप येणे, ताप हा सततचा असु शकतो किंवा दिवसाआड येऊ शकतो, नंतर घाम येऊन अंग गार पडते. डोके दुखते
बऱ्याच वेळा उलट्या  होतात. हिवतापाचा निश्चित निदानासाठी तापाच्या रुग्णाचा रक्तनमुना घेऊन तो सुक्ष्मदर्शकाखाली तपासणे आवश्यक असते.

Chinchwad : स्वानंद राजपाठक यांना पितृशोक; समाजसेवक विजयकुमार राजपाठक यांचे निधन

महापालिका क्षेत्रात हिवताप, डेंग्यु, चिकुनगुन्या सारखे रोग पसरू नयेत म्हणून महापालिकेने खबरदारी घेतली आहे. या मोहीमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.