PCMC Election 2022: शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आणणार – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज  – पिंपरी – चिंचवड महापालिकेतील सत्तेचा गैरवापर करत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी प्रत्येक कामांत गैरव्यवहार केल्याने शहराची पुरती अधोगती झाली. गेल्या पाच वर्षांतील भाजपच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली आहे. शहराचा पुन्हा विकास राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच होवू शकतो याची खात्री मतदारांना असल्यामुळे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी यावेळी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी – चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप आणि कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना गव्हाणे म्हणाले, गतवेळी झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी शहरवासीयांना भूलथापा मारल्या आणि खोटी आश्वासने दिली. महापालिकेत सत्ता आल्यानंतर दिलेल्या आश्वासनांपैकी एकही काम ते करू शकले नाहीत.

महापालिकेत गेल्या पाच वर्षांत झालेल्या प्रत्येक कामांत भ्रष्टाचार करण्याचे काम भाजपच्या नेत्यांनी केले आहे. भाजपच्या लाचखोरी, खंडणीखोरी आणि भ्रष्टाचारामुळे शहराची पुरती अधोगती झाली. शहरातील तरुणांना त्याची मोठी झळ पोहोचली आहे. शहरातील जनतेलाही विकास आणि भ्रष्टाचाराची जाणिव झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागस्तरावर मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. प्रभागरचना आणि आरक्षणही आपल्याला अडचणीचे ठरणार नसल्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील आणि आपलाच महापौर होईल याची खात्री आहे.

 

 

जुन्या – नव्या पदाधिकाऱ्यांसह तरुणांना अधिकची संधी दिली जात असल्याने पक्षामध्येही चैतन्य निर्माण झाले आहे. ‘पिंपरी चिंचवडच्या विकासाला हवी, पुन्हा वादळी गती, आपली राष्ट्रवादी’ हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत. कार्यकर्त्यांची ताकद आणि मतदारांचा विश्वास यावर महापालिकेत सत्ता येईल, असा विश्वासही गव्हाणे यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपकडून भ्रष्टाचाराचा कहर – बहल
गेल्या पाच वर्षांत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेची अक्षरश: लूट केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे समन्वयक तथा प्रवक्ते योगेश बहल यांनी केला. ते म्हणाले, कोरोना काळात भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी अक्षरश: महापालिकेची लूट केली. त्यानंतर कुत्र्यांच्या नसबंदीमध्ये भ्रष्टाचार केला. शिक्षणमंडळ, आरोग्य, वैद्यकीय विभाग, स्मार्ट सिटी सेंटरसारख्या प्रत्येक प्रकल्पात भ्रष्टाचार केला आहे. भ्रष्टाचाऱ्यांना शहरातील जनता यावेळी थारा देणार नसून महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय निश्चित असल्याचा दावाही योगेश बहल यांनी यावेळी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.