PCMC Election : महापालिका निवडणूक आता एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी एक महिना लांबणीवर पडली आहे. (PCMC Election) आता नवीन वर्षात म्हणजेच 17 जानेवारी 2023 रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत जैसे थे स्थिती कायम राहणार असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक आता एप्रिल-मे महिन्यात होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे हौशे-गवशे-नवसे यांच्या इच्छा-आकांक्षांना महिनाभर मूरड बसली आहे. सक्रिय झालेले राजकीय पक्ष, कार्यकर्ते पुन्हा थंडावले आहेत.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये प्रभाग रचनेबाबत एकमत होण्यास झालेला विलंब, कोरोना महामारी, निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाचे त्रांगडे आणि नंतर झालेला सत्ताबदल यामुळे महापालिका निवडणुका वेळेत होऊ शकल्या नाहीत. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात आला आहे. मागील दहा महिन्यांपासून पालिकेत प्रशासकीय राजवट सुरु आहे. अद्यापही महापालिका निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले नाही. त्यामुळे निवडणुकांचे भिजत घोंगडे कायम आहे.

न्यायालयातील सुनावणी लांबणीवर पडत आहे. प्रत्येकवेळी नव-नवीन आदेश येत आहेत. त्यामुळे पालिकेची निवडणूक शाखाही संभ्रमावस्थेत आहे. परिणामी, निवडणूक शाखेतही शांतता आहे. न्यायालयाबरोबरच राज्य शासन, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रतिक्षा केली जात आहे.(PCMC Election) महापालिका निवडणुकांबाबतची सुनावणी आता थेट 17 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. त्यामध्ये काय निकाल लागतो की पुन्हा सुनावणी लांबणीवर पडते? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

PCMC News : अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाल्यानंतर आई-वडिलांना सांभाळण्यास दिला जातोय नकार

शिंदे-फडणवीस सरकार चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्यास आग्रही आहे. त्यामुळे तीनसदस्यीय पद्धतीने की चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार? चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घ्यायची झाल्यास प्रभाग रचना, आरक्षण प्रक्रिया आणि मतदार यादी नव्याने करावी लागणार आहे. यामध्ये प्रभागातील मतदारसंख्येसह लोकसंख्यादेखील वाढेल. नव्याने प्रक्रिया करण्यासाठी दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे एप्रिल-मे 2023 मध्ये पालिकेची निवडणूक होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

आजपर्यंत नेमके काय झाले?

राज्य निवडणूक आयोगाने सर्वप्रथम 25 ऑगस्ट 2021 रोजी एक सदस्यीय पद्धतीने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने तीनसदस्यीय पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने 6 ऑक्टोबर 2021 रोजी तीन सदस्यीय पद्धतीने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले. दरम्यान, राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महापालिका नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय 27 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आला. त्यामुळे पालिकेची नगरसेवक संख्या 128 वरुन 139 वर गेली.

त्यानंतर तीनसदस्यीय पद्धतीने  निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली. प्रारुप प्रभाग रचना, अंतिम प्रभाग रचना, मतदार याद्या अंतिम झाल्या होत्या. दोनवेळा आरक्षण सोडत काढली. ओबीसींसह काढलेले प्रभागनिहाय अंतिम आरक्षण  5 ऑगस्ट 2022 रोजी शासन राजपत्रात प्रसिध्द केले जाणार होते. तेवढ्यात शिंदे-फडणवीस यांच्या सरकारने 3 ऑगस्ट 2022 रोजी राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने  लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांच्या वेगाची गरज लक्षात घेऊन वाढवलेली 11 नगरसेवकसंख्या रद्द केली.(PCMC Election) त्यामुळे नगरसेवकसंख्या 128 च राहिली आणि तीनसदस्यीय प्रभाग रचनाही रद्द झाली. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारचा कायदा, शिंदे सरकारने आणलेला प्रभाग रचनाबदलाचा अध्यादेश याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. त्यावर सुनावण्या सुरु आहेत.

त्यातच राज्य सरकारने  महापालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभागरचना तयार करण्याचे आदेश 22 नोव्हेंबर 2022 रोजी पालिकेला दिले होते. परंतु, तीनसदस्यीय की चार सदस्यीय पद्धतीने प्रभाग रचना करायची याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे निवडणूक विभागाने कोणतीही कार्यवाही हाती घेतली नाही. आता महापालिका निवडणुकांबाबतची सुनावणी 17 जानेवारी 2023 पर्यंत लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आता निवडणूक एप्रिल – मे महिन्यातच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

2017 ची सदस्यसंख्या आणि  प्रभाग रचना!

महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत एकूण सदस्यसंख्या 128 होती. त्यात महिला सदस्य 64, सर्वसाधारण सदस्य संख्या 64, नागारिकांचा मागास प्रवर्ग 35, अनुसूचित जाती सदस्य संख्या 20, अनुसूचित समाती सदस्यसंख्या 2, प्रभागातील सदस्य संख्या होती 4 तर प्रभागांची संख्या 32, चारसदस्यीय प्रभाग संख्या 32, प्रभागातील अधिकाधिक लोकसंख्या 44 हजार आणि कमीत कमी लोकसंख्या 36 हजार होती.

2022 मध्ये तयार केलेली  प्रभाग रचना आणि सदस्यसंख्या!

आगामी महापालिका निवडणुकीसाठी तीनसदस्यीय पध्दतीने प्रभाग रचना तयार केली होती. नगरसेवकांची संख्या 128 वरुन 139 वर नेली होती. तीनसदस्यीय पद्धतीनुसार 46 प्रभाग असणार होते. 139 नगरसेवकांपैकी 69 पुरुष तर 70 महिला नगरसेविका अशी वर्गवारी होती. (PCMC Election) सर्वसाधारण वर्गासाठी 77, ओबीसीसाठी 37, अनुसूचित जमाती (एसटी)साठी 3 तर  अनुसूचित जाती (एससी)साठी 22 जागा राखीव होत्या. प्रभागातील अधिकाधिक लोकसंख्या 41 हजार आणि कमीतकमी लोकसंख्या 33 हजार होती. त्यामुळे पालिकेची आगामी निवडणूक 2017 प्रमाणे होती की 2022 मध्ये केलेल्या प्रभाग रचनेनुसार होती याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.