PCMC News: पाण्याचा ठणठणाट; ‘शटडाऊन’मुळे मंगळवारपर्यंत पाणीपुरवठा विस्कळीतच राहणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा (PCMC News) करणा-या जलवाहिनीला लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीमुळे जवळपास 40 ते 42 तास पाणीपुरवठा यंत्रणा बंद होती. परिणामी, ऐन दिवाळीत शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. शहराच्या सर्वच भागातून अपु-या पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी येत आहेत. आज (शुक्रवारी) सकाळपासून पाणीपुरवठा सुरु केला आहे. परंतु, दुरुस्ती कामासाठी घेतलेल्या शटडाऊनमुळे पाणीपुरवठ्याची परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी मंगळवारची वाट पाहावी लागणार आहे.

पिंपरी-चिंचवडकरांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पालिका दिवसाला 510 एमएलडी पाणी उचलते. महापालिकेच्या वतीने रावेत येथून अशुद्ध जलउपसा केंद्राद्वारे पाण्याचा उपसा करून निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाते. याठिकाणी पाणी शुद्धीकरण करून शहरातील विविध भागांत नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. परंतु, 26 ऑक्टोबर रोजी रावेत येथे टप्पा 3 ला पाणीपुरवठा करणा-या 1400 मिलिमिटर व्यासाच्या जलवाहिनीला अचानक गळती सुरु झाली. त्यामुळे पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवावी लागली.

Jayant Patil : जयंत पाटील यांच्यासोबत कामगार प्रश्नांवर कामगार नेत्यांची सविस्तर चर्चा

ऐन दिवाळीत शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. बुधवारी (दि.26) सायंकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. मागील तीन वर्षांपासून शहरात एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. बुधवारी सायंकाळी थेरगाव, संत तुकारामनगर, चिखली, जाधववाडी या भागाला पाणी पुरवठा होणार होता. परंतु, जलवाहिनी लिकेज झाल्यामुळे या भागाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे या भागातून पाणीपुरवठ्याच्या सर्वाधिक तक्रारी येत आहेत. दुरुस्ती कामासाठी सुमारे 40 ते 42 तास   शटडाऊन घ्यावा लागला. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे सर्व नियोजन कोलमोडले. शहराच्या सर्वच भागात पाण्याची समस्या गंभीर झाली. सगळीकडूनच पाणीपुरवठ्याच्या तक्रारी येत आहेत. गुरुवारी रात्री दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. पंप सुरु करत टाक्या भरुन घेतल्यानंतर सकाळपासून पाणीपुरवठा सुरु केला आहे. बुधवारी सायंकाळी ज्या भागाला पाणीपुरवठा झाला नव्हता. त्या भागाला प्राधान्याने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.

 पाण्याची परिस्थिती मंगळवारपर्यंत पूर्वपदावर येईल – PCMC News

पाणी पुरवठा विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे म्हणाले, ”पंप गुरुवारी रात्री आठ वाजता सुरु झाले. रात्री पाण्याच्या टाक्या भरुन घेतल्या आहेत. आज सकाळपासून पाणीपुरवठा सुरु केला आहे. विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत शहराच्या सर्वच भागातून तक्रारी येत आहेत. दुरुस्तीमुळे जवळपास 40 ते 42 तास पाणीपुरवठा बंद होता. पाडव्यादिवशी संध्याकाळी ज्या भागाला पाणीपुरवठा करायचा होता. पण, लिकेजमुळे होऊ शकला नाही. त्या भागाला पाणीपुरवठा करण्यास सकाळपासून सुरुवात केली. थेरगाव, संत तुकारामनगर पिंपरी, चिखली, जाधववाडी या भागातून तक्रारींचे प्रमाण जास्त आहे. या भागाला पाडव्यादिवशी पाणीपुरवठा झाला नव्हता. या भागातील नागरिकांना प्राधान्याने पाणी दिले जात आहे. संपूर्ण शहराला पाणीपुरवठा सुरु आहे. पण, एक दिवसाआडच्या वेळेएवढे पाणी दिले जाणार नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्याची परिस्थिती मंगळवारपर्यंत पूर्वपदावर येईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.