PCMC : आता महापालिका  राबविणार ‘पे अँड पार्क’ योजना

एमपीसी न्यूज –  नागरिकांचा विरोध असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात ( PCMC ) सशुल्क वाहनतळ (पे अँड पार्क) योजना सुरू केली. नागरिकांना विश्वासात न घेणे, महापालिका प्रशासनाचा अतिआत्मविश्वास, वाहतूक पोलिसांचे असहकार, वाहनचालकांचा अल्प प्रतिसादामुळे ही योजना गुंडाळण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढविली. आता महापालिका स्वतः ही योजना राबविणार आहे.

1 जुलै 2021 पासून शहरातील प्रमुख रस्त्यांवर पे  अँड पार्क योजना सुरू करण्यात आली. तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर हे त्यासाठी खूपच आग्रही होते. शहरातील 396 ठिकाणी पे अँड पार्क योजना सुरू करण्यासाठी महापालिकेने लाखो रुपये खर्च करीत रस्ते रंगरंगोटीसह शेकडो सूचना फलक लावले, वाहतूक पोलिसांना टोईंग व्हॅन देण्यात आल्या. शहरातील काही ठिकाणी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली.

निर्मला ऑटो केअर या ठेकेदाराला हे काम तीन वर्षे कालावधीसाठी देण्यात आले. मात्र, वाहनचालक शुल्क देत नसून, शिवीगाळ व दादागिरी करीत असल्याचे प्रकार समोर आले. तसेच, वाहतूक पोलिसांकडून नो पार्किंगमधील वाहनांवर सातत्याने कारवाई होत नाही. त्यामुळे वाहनचालक कोठेही वाहन लावून निघून जातात. दुसरीकडे, अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने ठेकेदाराचाही उत्साह मावळला. परिणामी, ही योजना शहरातील अनेक भागांतून गुंडाळण्यात आली. अखेर, ठेकेदाराने काम बंद करण्याबाबत आयुक्तांना पत्र पाठविले.

Pune : महाराष्ट्रातील मातब्बर मल्ल हडपसरमध्ये दाखल, उद्यापासून रंगणार सेना केसरी कुस्तीचा महासंग्राम 

वाहनचालकांसाठी मोबाईल ॲप तयार करून, पे अँड पार्क योजना करारनाम्यानुसार 3 वर्षे सुरू ठेवण्याबाबत आयुक्तांनी ठेकेदाराला सूचना केली. त्यानुसार शहरातील मोजक्याच रस्त्यांवर शुल्क वसुली सुरू आहे. मात्र, त्याला प्रतिसाद अल्प आहे. वाहनचालकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. अनेक वाहनचालक शुल्क देत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नव्याने सुरू केलेली ही योजनाही बंद पडली आहे.  आता, महापालिका स्वतः ही योजना राबविणार आहे. त्यातून दरवर्षी कोट्यवधीचे उत्पन्न मिळणार असून, महापालिकेचे कर्मचारी त्यासाठी तैनात करण्यात येणार आहेत. हे काम क्षेत्रीय कार्यालयानुसार केले चालणार आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाने केला आहे.

महापालिकेचा लाखोंचा खर्च वाया

पे अँड पार्क योजनेसाठी महापालिकेने 396 ठिकाणी पांढरे पट्टे रंगविले. तसेच, नो पार्किंग, पार्किंग असे शेकडो सूचना फलक लावले. त्यावर 45 लाखापेक्षा अधिकचा खर्च करण्यात आला. तसेच, वाहतूक पोलिसांना नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करण्यासाठी टोईंग व्हॅन उपलब्ध करून दिली. त्यावर महापालिकेने लाखो रुपयांचा खर्च केला. सध्या अनेक फलक गायब झाले आहेत. खोदकाम व डांबरीकरण झाल्याने काही रस्त्यांवरील पांढरे पट्टे दिसत नाहीत. महापालिकेने केलेला हा खर्च वाया गेला ( PCMC ) आहे.

पे अँड पार्क योजना ठेकेदाराला यशस्वीपणे राबविता आली नाही. महापालिकेस दरमहा मोठे उत्पन्न मिळणार असल्याने महापालिका ही योजना स्वतः राबविणार आहे. त्यासाठी महापालिकेचे कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील अहवाल तयार करून आयुक्तांसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता, महापालिका.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.