PCMC : प्रदिप जांभळेंना ‘मॅट’चा दणका, अतिरिक्त आयुक्तपदाची नियुक्ती 22 सप्टेंबर पर्यंतच

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (PCMC) अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे यांना महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट)ने दणका दिला आहे. जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदाची नियुक्ती 22 सप्टेंबर पर्यंतच असणार आहे. 22 सप्टेंबरनंतर त्यांची नियुक्ती संपुष्टात येईल. नगरविकास विभागाने नियुक्तीचा आढावा घ्यावा, पात्रता, निकष तपासवेत असे आदेशही मॅटने दिले आहेत.

महापालिकेत उपायुक्त असलेल्या स्मिता झगडे यांची 13 सप्टेंबर 2022 रोजी राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. पण, आयुक्त शेखर सिंह यांनी नऊ दिवस झगडे यांना रुजू करुन घेतले नाही. भाजप आमदार आणि आयुक्तांनी प्रतिष्ठतेचा विषय केला होता.

त्यानंतर राज्य शासनाने 22 सप्टेंबर 2022 रोजी झगडे यांची नियुक्ती रद्द करुन प्रदिप जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. पण, झगडे यांनी जांभळे यांच्या नियुक्तीला ‘मॅट’मध्ये आव्हान दिले होते. झगडे यांनी राज्य सरकार, प्रदीप जांभळे आणि महापालिका आयुक्त यांना प्रतिवादी केले होते.

महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट)चे सदस्य ए.पी. कु-हेकर यांच्या खंडपीठाने प्रदिप जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदावरील नियुक्ती रद्द केली होती. पण, जांभळे यांनी या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा मॅटकडे पाठविले होते.

महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट)चे सदस्य मृदुला भटकर (PCMC) आणि देबाशीष चक्रवर्ती यांच्या खंडपीठापुढे त्याबाबत सुनावण्या झाल्या. सलग तीन दिवस सुनावणी झाली. स्मिता झगडे यांच्या वतीने अॅड. अरविंद बांदिवडेकर यांनी युक्तीवाद केला.

प्रदिप जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदावरील नियुक्ती नियमांचे उल्लंघन करून झाल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. त्यातील त्रुटी सांगितल्या. त्यावर प्रदिप जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदावरील नियुक्ती 22 सप्टेंबर 2023 पर्यंतच राहील. त्यादिवसापासून जांभळे यांची दोन वर्षांची नियुक्ती संपुष्टात येईल.

नगरविकास विभागाने नव्याने आदेश काढताना पात्रता तपासावी. निकष बघावेत असे आदेश मॅटने दिले आहेत. त्यामुळे जांभळे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

Pimpri : ब्रँडेड कंपनीच्या नावाने बनावट मालाची विक्री, तीन दुकानदारांवर गुन्हा दाखल

अजित पवारांच्या मर्जीतील अतिरिक्त आयुक्त येणार?

पिंपरी-चिंचवड शहर अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. आता अजितदादा शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये आहेत. त्यामुळे शहरात अजितदादांच्या मर्जीतील अधिकारी आणले जातील. आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे हे अधिकारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या मर्जीतील आहेत.

प्रदिप जांभळे हे भाजप आमदाराच्या मर्जीतील आहेत. त्यामुळे दुसरे अतिरिक्त आयुक्त आणताना अजितदादांचा शब्द अंतिम राहिल. जांभळे यांची फेरनियुक्त होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता अजितदादा आपल्या मर्जीतील कोणत्या अधिकाऱ्याला अतिरिक्त आयुक्तपदी आणतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.