PCMC : कर संवादमध्ये मालमत्ता धारकांच्या विविध शंकाचे निरसन, मालमत्ता हस्तांतरण कसे करायचे?

एमपीसी न्यूज – ऑनलाईन मालमत्ता हस्तांतरण (PCMC) कसे करायचे, घर महिलेच्या नावे असेल तर कर आकारणीमध्ये किती सूट मिळते, त्यासाठी काय कागदपत्रे लागतात या सारख्या अशा विविध शंकाचे निरसन करसंवादमध्ये कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांच्यासह त्यांच्या विभागातील अधिका-यांनी ‘ऑन दी स्पाॅट’ आज (शनिवारी) केले. तसेच मालमत्ता सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जनसंवाद सभेच्या धर्तीवर करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांच्या संकल्पनेतून ऑनलाईन आणि ऑफलाईन कर संवाद घेण्यात येत आहे. यामध्ये शहरातील नागरिक घर बसल्या आपले प्रश्न मांडून साेडून घेत असल्यामुळे कर संवादला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या संवादमध्ये शहरात सध्या सुरू असलेल्या मालमत्ता सर्वेक्षणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. हे सर्वेक्षण मालमत्ता धारकांच्या कसे फायद्याचे आहे, याचे महत्व पटवून देण्यात आले. त्यानुसार सर्वेक्षणामध्ये आकारणी न झालेल्या मालमत्ता कर कक्षेत आणून सर्व मालमत्तांना सुलभ क्रमांक देऊन मालमत्तेची माहिती अद्ययावत करण्यात येणार आहे. मालमत्ता सर्वेक्षणात युपीक (UPIC) आयडी दिल्यामुळे भविष्यात महापालिकेच्या सर्व सेवा, शासनाचे इतर विभाग यांच्यात समन्वय राहण्यासाठी उपयुक्त होणार आहे.

Pimpri : श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण व निमंत्रण महाअभियान, 7 लाख घरी संपर्क करणार

नागरिकांना ‘डिजी लॉकर’च्या धर्तीवर मालमत्तेसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे ‘प्रॉपर्टी लॉकर’च्या माध्यमातून सुरक्षित ठेवण्याची सुविधा,मालमत्तेची अचूक (PCMC) मोजणी करून माहिती व पत्ता अद्ययावत करणे, मालमत्तेची विश्वासर्हता वाढून खरेदी, विक्री व्यवहार सुलभ होण्यास मदत, मालमत्ता कर आकारणीबाबत संपूर्ण माहितीचे संकलन करून मालमत्ते अंतर्गत असणाऱ्या रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर पॉवर, घनकचरा विलगीकरण आदी सुविधांबाबत प्रत्यक्ष सर्वेक्षण करून जागेवरच मिळणाऱ्या सवलतीबाबत नोंद करण्यात येणार आहे. हे करत असताना नागरिकांची डिजिटल गोपनीयता जपली जाणार आहे. मालमत्ता धारकांची कागदपत्रे महापालिकेला सार्वजनिक करण्याचा किंवा न करण्याचा अधिकार नागरिकांकडेच असणार आहे. या संदर्भात सर्व माहिती, प्रश्नांची उत्तरे या करसंवादमध्ये सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांच्यासह त्यांच्या टीमने दिली.

मालमत्ता धारकांचे विविध प्रश्न असतात. मात्र, वेळे अभावी ते कार्यालयात येऊ शकत नाहीत. त्यामुळेच विभागाच्या वतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दाेन्ही पध्दतीने महिन्याच्या शेवटच्या शनिवारी करसंवाद घेण्यात येत आहे. घर बसल्या प्रश्न सुटत असल्याने मालमत्ता धारकांचा माेठा प्रतिसाद मिळत असून हा एक ‘माईलस्टाेन संवाद’ ठरत असल्याचे कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.