Pcmc School News : अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने पाचवी ते आठवीचा निकाल जाहीर

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सलग दुसर्‍या वर्षी परीक्षा रद्द झाल्याने पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करुन निकाल देण्याचा तोडगा काढण्यात आला. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील जवळपास सर्व शाळांनी वैयक्तीक स्तरावर मूल्यमापन करुन निकाल जाहीर केला आहे.

दरवेळी शालेय निकाल हे 1 मे रोजी लागतात. यंदा कोरोनामुळे अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने पहिल्यांदाच अशा पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आला. एक ते दीड महिन्यापूर्वी शासनाने परीक्षा न घेण्याचा आदेश दिला. तसेच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करुन पुढच्या वर्गात पाठवा असे सांगण्यात आले. या अनुषंगाने शाळांनी वर्षभर केलेल्या कामाचा अहवाल शासनाला द्यायचा होता. शासनाने शाळांनी पूर्वीप्रमाणे मूल्यमापन केले असेल तर तशा नोंदी ठेवायला सांगितल्या आहेत.

विद्यार्थ्यांनी काहीच केले नसेल तर त्यास आरटीई कायद्यानुसार पुढच्या वर्गात पाठवा असे सांगितले आहे. अंतर्गत मुल्यमापन कसे करावे यासाठी शासनाने अधिसूचना देखील पाठविली आहे.

कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता मागील जूनपासून ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. शिक्षण विभागाने हे शिक्षण नेमके कसे चालते, यामध्ये काही त्रुटी आहेत का, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होते का, हे पाहण्यासाठी याबाबतचा एक अहवाल शाळांकडून मागविला होता.

शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या शाळांमध्ये ऑनलाइन, व्हॉट्सअ‍ॅप, ऑनलाइन तोंडी परीक्षा, ऑफलाइन परीक्षा, घरी पेपर सोडविण्यास देणे, कार्यपुस्तिका देणे आणि इतर अशा विविध पर्यायांचा वापर करून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आले आहे.

नववीचा वर्ग देखील दहावीसाठी पात्र ठरविला आहे. पण त्यांचे जेवढे मूल्यमापन झाले आहे त्याची टक्केवारी निश्चित करुन त्यांना पुढच्या वर्गात पाठवा, असे सांगितले आहे. एखाद्या विद्यार्थ्याने काहीच केले नसेल तर त्यास फक्त शासनाच्या सूचनेनुसार पुढच्या वर्गात प्रवेश, असा एक शेरा द्यायचा आहे.

हवे तसे मूल्यमापन नाही !

ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत अनेक अडचणी होत्या. ज्या ठिकाणी नेटची उपलब्धता होती, त्याठिकाणी या गोष्टींना न्याय मिळाला. मात्र, मराठी माध्यम व महापालिका शाळांधील 30 टक्के पालकांकडे इंटरनेट सुविधाच नव्हती. शिक्षकांनी जेवढे शक्य होईल. तेवढे ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण शिक्षणाचे जे वर्षभर जसे मूल्यमापन व्हायला पाहिजे तसेच झाले नाही, असे शिक्षक सांगतात.

महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे म्हणाल्या, “निकाल तयार करण्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना आल्या होत्या. त्यानुसार महापालिकेच्या 105 शाळांनी निकाल तयार केला आणि निकालही जाहीर करण्यात आला आहे. काही खासगी शाळांनी देखील शाळा पातळीवर निकाल जाहीर केला आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.